Aaditya thackeray Worli Holi Celebration Dance : दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. वरळी कोळीवाडा, माहिम कोळीवाडांसह ठिकठिकाणी होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आता शिवसेना नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी कोळीवाड्यातील होळीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वरळीकरांसोबत ठेकाही धरला. याचा एक व्हिडीओ त्यांनी स्वत: शेअर केला आहे.
संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची धामधूम पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आदित्य ठाकरे यांनी होळीनिमित्त वरळी कोळीवाड्यात हजेरी लावली. याचा एक व्हिडीओ आदित्य ठाकरेंनी पोस्ट केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देताना त्यांनी वरळी कोळीवाड्यातील होळीत सहभागी झाल्याचे सांगितले. "काल, वरळी कोळीवाडा येथील पाखरे गल्लीतील नवरंग होळी मंडळाच्या होलिका मातेचे दर्शन घेऊन समाजातील दुष्ट वृत्तींचा नायनाट करण्याचे साकडे, देवीला घातले. यावेळी येथील स्थानिकांसोबत पारंपरिक नृत्यात सहभागी झालो.", असे आदित्य ठाकरे यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
त्यांनी या पोस्टसोबत शेअर केलेल्या व्हिडीओत आदित्य ठाकरे हे वरळीतील कोळी बांधवांसोबत कोळी गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. आदित्य ठाकरेंसोबत खासदार अरविंद सावंत, सचिन अहिर हे नेतेही पारंपारिक गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला वरळीतील अनेक महिला आणि स्थानिक कोळी बांधव हे नाचताना दिसत आहेत.
दरम्यान कोळी बांधवांसाठी होळी हा अत्यंत उत्साहाचा आणि मोठा सण असतो. वरळीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा सण साजरा केला जातो. दरवर्षी वरळी कोळीवाड्यात हा उत्साह पाहायला मिळतो. सध्या आदित्य ठाकरेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करत आदित्य ठाकरेंना होळीच्या शुभेच्छा देत असल्याचे पाहायला मिळत आहे.