मुंबई: अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना मुंबईत शिवसेनेकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेने मुंबईतील विविध भागांमध्ये रस्त्यांवर होर्डिंग्ज लावली आहेत. यामध्ये 'गर्जना साहेबांची, स्वप्नपूर्ती हिंदूंची' अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. वरळी, दादर, पवईसह विविध ठिकाणी शिवसेनेकडून ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. अयोध्येत बुधवारी होऊ घातलेल्या भूमिपूजन सोहळ्याला देशातील मोजक्याच मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा समावेश नाही. त्यामुळे आता शिवसेनेकडून मुंबईत पोस्टरबाजी करुन राममंदिराच्या श्रेयावर दावा केला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता भाजपचे नेते यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
'राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून १ कोटी रुपये आले, कुणी पाठवले माहिती नाही, पण...'
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतली होती. तसेच राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेतले होते. त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्त्वाची कास सोडल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी आपण हिंदुत्त्वाची कास सोडली नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच अयोध्येला जाण्यासाठी आपल्याला कोणाच्याही निमंत्रणाची गरज नाही. आपण कधीही तिकडे जाऊ शकतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
दरम्यान, राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराची कोनशिला रचली जाईल. या पार्श्वभूमीवर अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. अयोध्यतेली सर्व मंदिरे खुली ठेवण्यात येणार असून लोकांना दिवाळी साजरी करावी, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.