मुंबई : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय सेवादलाने स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेलं पुस्तक वाटलं. मध्य प्रदेशात काँग्रेस सेवादलाच्या शिबिरात वीर सावरकर कितने वीर हे पुस्तक वाटण्यात आलं. त्यामध्ये नथूराम गोडसे आणि वीर सावरकरांचे समलैंगिक संबंध असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर आता काँग्रेसवर चौफेर टीका होत आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या पुस्तिकेवर निशाणा साधला आहे. भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही. हे पुस्तक अनधिकृत आणि बेकायदेशीर आहे. सावरकरांविषयी आम्हाला कोणीही ज्ञान देण्याची गरज नाही. सावरकर या देशाला प्रिय आहेत आणि राहतील. फालतू पुस्तकामुळे सावरकरांविषयी श्रद्धा कमी होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
या मुद्द्यावरुन सावरकरांचे नातू रणजित सावरकर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात गेले होते. मात्र उद्धव ठाकरेंना वेळ नसल्यानं भेट होऊ शकली नाही. 'वीर सावरकर कितने वीर?' या पुस्तकावर बंदी घालण्याची रणजित सावरकरांची मागणी आहे.