Governor Bhagat Singh Koshyari, मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपालांवर टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता महाराष्ट्रच्या राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा, राज्यपालांनी अवमान केल्याचा ठपका याचिकेत ठेण्यात आला आहे.
याचिकाकर्ते दीपक दिलीप जगदेव यांच्या वतीने ऍड नितीन सातपुते यांनी ही याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने CRPIL/19909/2022 या क्रमांकानं याचिका दाखल करून घेतली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
वर्तमान राज्यपालांनी जनतेतील एकोपा आणि शांतता बिघडवल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 आणि 156 अंतर्गत महाभियोगाची कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे. उच्च न्यायालयात ही फौजदारी जनहित याचिका दाखल झाली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कलम 19 अंतर्गत बंधने काय ? असा सवालही याचिका कर्त्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी नेहमी चर्चेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहेत. आता नवे आदर्श गडकरी आणि शरद पवार हे तुमच्यासमोर बसले आहेत असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांसमोर केले. औरंगाबाद मध्ये त्यांनी हे वक्तव्य केले होते.