मुंबई : वाढत्या महागाईविरोधात आता मनसेही रस्त्यावर उतरणार आहे. दस-याला मनसे कार्यकर्ते महागाईरुपी रावणाचं दहन करणार आहेत. संपूर्ण मुंबईत रावण दहनाचा हा कार्यक्रम राबवला जाणार आहे.
शनिवारी शिवसेनेनं महागाईविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. आता शिवसेनेपाठोपाठ मनसेही महागाईविरोधात आक्रमक झाली आहे. उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी आता भाजपप्रणित केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात हल्ला चढवण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय.
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबूकच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केलेय. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय, असे म्हटलंय. भाजपने जे अस्त्र वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय, असे राज म्हणालेत.
भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झाल्याची टीका त्यांनी केली.
निवडणुका जिंकण्यासाठी वाट्टेल ती आश्वासनं दिली, लोकांची मनं भडकवण्यासाठी खोट्याचं खरं करून दाखवलं, आणि जे याला विरोध करत होते त्यांना 'ट्रोल्स' च्या माध्यमातून शिवीगाळ केली, त्यांचं खच्चीकरण केले, असे ते म्हणालेत.