मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रीमंडळ बैठकीत ३ मेट्रो मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. गायमुख - शिवाजी चौक ( मीरा रोड ), वडाळा - सीएसएमटी, कल्याण-डोंबिवली-तळोजा असे हे तीन मार्ग आहेत.
कल्याण मेट्रोचा विस्तार डोंबिवलीमार्गे तळोजापर्यंत करण्याची घोषणा याआधी मुख्यमंत्र्यांनी केली होती. नोव्हेंबर महिन्याच्या बैठकीमध्ये मेट्रो १२ अर्थात कल्याण-डोंबिवली-तळोजा मार्गाच्या प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात आली होती. कल्याणमधून डोंबिवलीमार्गे तळोजा असा हा मार्ग असून २०.७५६ किमी लांबीच्या या मार्गावर १७ स्थानकांचा समावेश असणार आहे.
मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे जाळे पसरत आहे. मेट्रोच्या अनेक मार्गाच्या कामांना गती मिळाली आहे. याआधी मेट्रोच्या संचालनासाठी मुंबई मेट्रो संचालन महामंडळ स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे महामंडळ स्वायत्त स्वरूपाचे असून मेट्रो सोबतच मोनोरेलचेही संचालन आणि व्यवस्थापन याबाबतचे काम ते पाहणार आहे.
गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो मार्गिका-१० (४,४७६ कोटी रू., ११.४ किमी), वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मेट्रो मार्गिका-११ (८,७३९ कोटी, १४ किमी) आणि कल्याण - तळोजा मेट्रो मार्गिका १२ (४,१३२ कोटी रू.,२५ किमी) या तीन मार्गिकांना मंजुरी देण्यात आली आहे.