योगेश खरे, नाशिक : देशासाठी शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते. अमर रहेच्या घोषणा दिल्या जातात आणि नंतर हे शहीद विस्मरणात जातात. पण त्यांचं कायम स्मरण राहावं, यासाठी नाशकात एक चालतंफिरतं शहीद जवानांचं जीवंत स्मारक आकारलं आहे.
देशासाठी शहीद झालेल्या जवानावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होतात. भारत माता की जय अशा घोषणा देत शहिदाला अखेरचा निरोप दिला जातो. आणि मग पुढं...? अनेकदा त्यांचं साधं स्मारकही उभारलं जात नाही. पण याला अपवाद ठरलाय तो नाशिकचा तरुण. पंडित अभिषेक गौतम... या अभिषेकचं शरीर म्हणजे चालतं-फिरतं स्मारकच जणू... छातीवर, पाठीवर, हातांवर गोंदवून घेतलेले हे टॅटू म्हणजे अभिषेकच्या देशप्रेमाची प्रतिकं.
छत्रपती शिवाजी महाराज, झांशीची राणी, महाराणा प्रताप यांचे टॅटू त्यानं शरीरावर काढलेत. कारगिल युद्धात शहीद झालेल्या तब्बल 559 जवानांची नावं त्यानं शरीरावर गोंदवून घेतलीत.
शरीरावर टॅटू कोरणं, हे वाटतं तेवढं सोप्पं नाही. अभिषेकनं सलग अकरा दिवस, दररोज आठ तास आपलं शरीर गोंदवून घेतलं. त्यासाठी त्याला पेन कीलरही घ्याव्या लागल्या.
या शहीदांच्या घरी जाऊन त्यांच्या घरची माती देखील अभिषेक जमा करतोय.. त्याच्या या अनोख्या देशप्रेमाबद्दल कारगिल युद्धातले अपघातग्रस्त जवानही कृतज्ञता व्यक्त करत आहे.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला लाऊड स्पीकरवरून 'जरा याद करो कुर्बानी' अशी गाणी लावून भागणार नाही. तर अभिषेकसारखं निस्सीम देशप्रेम तरुणांनी जपण्याची गरज आहे. तरच देशासाठी प्राण देणाऱ्यांचं बलिदान सार्थकी लागेल.