तांड्यावरचा तरुण बनला पोलीस उपनिरीक्षक; आई, वडील आणि पत्नीच्या साथीने MPSC परीक्षेत मिळवले यश

सुनीलच्या घरी पाच एक्कर कोरडवाहू शेती आणि तीही खडकाळ. मोठं उत्पन्न तर सोडा साधं घरी खाण्यापुरतं धान्यही पिकणं कठीण. अशा परिस्थितीत सुनीलचे आई वडील रस्त्यावर वर गिट्टी फोडण्याचे काम करायचे. 

Updated: Jul 5, 2023, 11:30 PM IST
तांड्यावरचा तरुण बनला पोलीस उपनिरीक्षक;  आई, वडील आणि पत्नीच्या साथीने MPSC परीक्षेत मिळवले यश title=

गणेश मोहोळ, वाशिम, झी मीडिया : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या  पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या रंजितनगर लभान तांड्यावरचा सुनील खचकड हा राज्यात प्रथम आला आहे.  घरची हालाखीची परिस्थिती, मुक्त विद्यापीठातून झालेलं शिक्षण, सतत दोन वेळा थोड्या मार्काने हुकलेली संधी अन आता राज्यात प्रथम असा हा अत्यंत खडतर प्रवास  सुनीलने आई वडील आणि पत्नीच्या साथीने यशाच्या शिखरावर नेवून पोहचवला आहे.

वाशिम जिल्ह्यातील  पाळोदी गावाला लागून असलेला 200 ते 250 लोकसंख्या असलेल्या रंजितनगर मधील 'मथुरा लभान' जातीच्या लोकांचा तांडा. शिक्षणाशी दुरदुरूनही संबंध नाही. सुनिलनेही मोल मजुरी करून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीतून बीए केलं. घरची परिस्थिती बदलायची असेल तर नोकरी मिळवणं महत्वाचं आणि नोकरी मिळवायची असेल तर स्पर्धा परीक्षा हाच एकमेव मार्ग हे लक्षात घेऊन सुनीलने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सहा वर्षांपूर्वी संभाजीनगर गाठलं. महागडे क्लास लावणं शक्य नव्हतं म्हणून मित्रांच्या साथीने अभ्यास सुरु केला आणि 2018  साली पहिला निकाल आला. तेव्हा सुनीलसह आणखी दोघांना सामान गुण होते. म्हणून जास्त वय असलेल्याला संधी मिळाली आणि सुनील 0 गुणाने कटला. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. पण, सुनील खचला नाही त्याने पुन्हा तयारी सुरु केली. 2019 साली लागलेल्या निकालात सुनीलला 4 गुणाने पुन्हा हुलकावणी मिळाली. 

वाढतं वय लक्षात घेऊन आता आईवडील मात्र थांबायला तयार नव्हते त्यांनी सुनीलचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2020 साली नांदेड जिल्ह्यातील आत्याच्या मुलीशी सुनीलचं लग्न ठरलं ती धाराशिव जिल्ह्यात पोलीस दलात भरती झाली होती. कोणतीही नोकरी नसलेल्या सुनीलची मेहनत अन अभ्यासावर विश्वास दाखवत उर्मिलाने लग्नाला होकार दिला आणि पुढील काळात पतीचं स्वप्न साकार करण्यासाठी त्याला आर्थिक आणि मानसिक पाठबळ दिलं. कोणत्याही यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो ही म्हण तिने सार्थ ठरवली. पती अभ्यास करत असताना तिने नोकरी करून घर सांभाळलं.

राज्यात प्रथम येण्याविषयी सुनीलला विचारलं असता तो सांगतो. मागील दोन वेळा थोडक्यात हुकलेली संधी आणि लग्न झाल्यामुळे वाढलेली घरची जबाबदारी यामुळे यावर्षी कोणत्याही परिस्थितीत निवड झालीच पाहिजे यासाठी मी आग्रही होतो. परीक्षा दिल्यानंतर तशी खात्रीही होती. मात्र, राज्यात प्रथम येणं हे माझ्यासाठीही अनपेक्षित आहे. आई-वडील,पत्नीची साथ अन मित्राचं मार्गदर्शन यामुळे हे शक्य होऊ शकलं. मथुरा लभान सारख्या अत्यंत मागास समाजातून मी येत असल्याने त्यांच्या प्रगतीसाठी मी नेहमी कार्यरत राहणार त्याने सांगितले आहे.