जयेश जगड, झी मीडिया, वाशिम : मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांवर जणू आभाळ फाटलंय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं रब्बीचं हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलंय. खरीपाचा हंगाम आला मात्र त्याला भाव मिळाला नाही. त्यामुळं रब्बीवर सर्व आशा होत्या. मात्र गारपिटीमुळं शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा धुळीस मिळाल्या आहेत.
मोठ्या कष्टानं पिकवलेल्या गव्हाची अवस्था पाहून वाशीम जिल्ह्यातील जोगेश्वरी गावातील सीताराम कांबळे हा शेतकरी धाय मोकलून रडला... अर्ध्या तासात होत्याचं नव्हतं झालं होतं... हातातोंडाशी आलेलं पाच एकरातील गव्हाचं पीक आडवं झाल्यामुळं डोक्यावरचं पाच लाख रुपयांचं कर्ज कसं फेडायचं? असा प्रश्न त्याला पडलाय.
सीताराम कांबळे यांच्यासारखीच अवस्था विष्णू मापारींची झालेली दिसली. हरभऱ्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काढणीला आलेल्या हरभऱ्याचे घटे फुटले आहेत.
पावसानं दगा दिल्यामुळं खरीपात शेतकऱ्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही. त्यामुळं रब्बीवर शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. पीकही चांगलं आलं होतं... मात्र काढणीपूर्वीचं अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं रब्बीचं पीक पूर्णपणे वाया गेलं असून मायबाप सरकार मदत करील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. सरकारने तातडीनं नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.