मुख्यमंत्री फडणवीस यांना सुप्रिया सुळे यांचा पुन्हा टोला

'मुख्यमंत्री तुम्ही महाजनादेश यात्रेतून फक्त आकडे फेकू नका तर लोकांचे प्रश्न सोडवा.'

Updated: Aug 27, 2019, 08:10 PM IST
मुख्यमंत्री फडणवीस यांना सुप्रिया सुळे यांचा पुन्हा टोला title=

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही महाजनादेश यात्रेतून फक्त आकडे फेकू नका तर लोकांचे प्रश्न सोडवा. आकड्यांनी पोट भरत नाही तर धान्य पिकले तर पोट भरले, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना हाणला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्यात, स्वर्गीय सुषमा स्वराज एकदा तत्कालिन अर्थमंत्री प्रणब मुखर्जीं यांना म्हणाल्या होत्या की 'आँकडो से पेट नहीं भरता, पेट भरता है धान से', या मुख्यमंत्र्यांना मला हेच सांगायचे आहे. महाजनादेश यात्रेतून फक्त आकडे फेकू नका तर लोकांचे प्रश्न सोडवा.

'भ्रष्टाचाराचे आरोप असणारे भाजपात'

यावेळी सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांनी नेहमी शेतकरी हिताचा विचार केला. मात्र, आज सत्ताधारी करताना दिसत नाहीत. शरद पवार कृषीमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले होते. जेव्हा सभागृहात कांद्याचा मुद्दा येत असे. त्यावेळी विरोधक साहेबांवर धावून जात असत. परंतु त्यांनी केवळ शेतकरी हिताचाच विचार केला. हेच विरोधक आज सत्तेत आहेत पण कांदा असो किंवा दूध त्यांचे दर वाढलेले आहेत. परंतु कोणीही काहीही बोलत नाही. शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'जनादेश यात्रा' आणि खासदार सुप्रिया सुळे यांची 'संवाद यात्रा' सुरु असताना दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राष्ट्रवादीत असताना ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना भाजपमध्ये घेऊन कोणत्या वॉशिंग पावडरने स्वच्छ करता, असा सवाल त्यांनी विचारला होता. तर सुप्रियांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी भुसावळमध्ये उत्तर दिले. भाजपकडे वॉशिंग पावडर नसून विकासाचं डॅशिंग केमिकल असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.