मुंबई : ST employees strike : एसटी संपाबाबतची महत्वाची बातमी. एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार कामावर रुजू होण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांचा पगार कापला जाऊ शकतो.
आजपर्यंत कर्मचारी रुजू झाल्यास निलंबन मागे घेतले जाणार आहे. जर आज कामावर गैरहजर राहिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक डेपो सुरु झाले आहेत. दरम्यान, पुण्यातील स्वारगेट डेपो सुरू होणार का, याची उत्सुकता आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्र्यांनी अल्टिमेटम दिल्यानंतर काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तसेच कामावर रुजू होण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. आजपर्यंत कर्मचारी रुजू झाल्यास निलंबन मागे घेणार, असं परिवहन मंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आज कर्मचारी कामावर गैरहजर राहिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय. एसटी कामगार आजपर्यंत कामावर हजर झाले नाहीत, तर कारवाईचा निर्णय घेतला जाईल. तुटेपर्यंत ताणू नका अशा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. आजपर्यंत जे कामगार रुजू होतील, त्यांचं निलंबन मागे घेण्यात येईल, असं अनिल परब यांनी सांगितले.
राज्यातील अनेक डेपो सुरू झाले आहेत. पुण्यातील स्वारगेट डेपोचे आंदोलक कर्मचारी संजय मुंडे यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, तब्बल 19 दिवसांनी गुरूवारी रायगडच्या रस्त्यांवर लालपरी धावली. महाड आणि पेण आगारातील कंडक्टर ड्रायव्हरसह काही मोजके कर्मचारी यावेळी कामावर हजर होते. पेण ते खोपोली, नागोठणे आणि पनवेल मार्गांवर एसटी बसेस धावल्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय आंदोलनात दोन गट पडले असतानाच रायगड जिल्हयात तेच चित्र पहायला मिळतंय.
एसटी कर्मचाऱ्यांची गटानुसार वेतनवाढ अमान्य असून विलिनीकरण हवे असल्याची ठाम भूमिका वाशिम जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली. कोणतीही कारवाई झाली तरी मागे हटणार नसल्याचं वाशिमच्या एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.