अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरचा कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या सतरंजीपुरामधील १२६ कोरोना संशयिताना वानाडोंगरी परिसरातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. आता स्थानिक नागरिक आणि नेत्यांनी त्याचा विरोध सुरू केला आहे. वानाडोंगरी हे नागपूरच्या बाहेरील ग्रामीण भाग आहे. तिथे एकही कोरोना बाधित रुग्ण नाही.अशावेळी कोरोना संशयितांना येथे आणणं धोक्याचं आहे असं सांगत आमदार समीर मेघेंनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
नागपूरातील कोरोनाचा केंद्रबिंदू बनलेल्या सतरंजीपुरा भागातून आणलेले संशयित वानाडोंगरी परिसरातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह ठेवण्यात आले आहे. मात्र या संशयितांना कशाला ग्रामीण भागात ठेऊन तिथल्या हजारो ग्रामिणांचा जीव धोक्यात घालता असा प्रश्न स्थानिक आमदार समीर मेघे यांनी उपस्थित केला आहे. याच मुद्द्यावर समीर मेघे आपल्या सहकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनावर बसले आहे..
ज्या वसतिगृहात १२६ संशयितांना हलवण्यात आले आहे, त्या ठिकाणी एवढ्या लोकांना ठेवण्याची जागा आणि पुरेश्या संख्येत स्वच्छता गृह नाहीत. त्यामुळे तिथे रोग पसरण्याची भीती मेघे यांनी व्यक्त केली आहे.. यामुळे ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. त्यामुळे वानाडोंगरी येथे संशयितांना ठेवण्याचा हा निर्णय वादग्रस्त झाला आहे...