मेघा कुचिक, मुंबई - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सडेतोड आहेत. स्पष्टवक्तेपणा, कामाचा उरक, वक्तीशीरपणा, प्रशासनावर अंकुश ठेवण्याची कला हे त्यांचे गुण आहेत. मात्र त्यांचा अजून एक गुण आहे तो म्हणजे स्वच्छता राखणे. अजित पवारांना स्वच्छता फार आवडते याबाबत खूप कमी जणांना माहीत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आज मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अजितदादांचा एक प्रसंग सांगितला.
पर्यावरण दिन असल्याने कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर अर्थातच पर्यावरण, निसर्ग याबाबत बोलत होते. मात्र महसूलमंत्री यांनी तर भाषणात पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणून कसे वागावे याबाबत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेच उदाहरण दिले. भाषणात बाळासाहेब प्रसंग सांगताना थोरात म्हणाले, "शरद पवार यांच्यासह अमेरिकेत राज्यातील मंत्र्यांचा एक दौरा आयोजित करण्यात आला होता. अमेरिकेत आम्ही सारे मंत्री फिरत असताना चॉकलेटचा एक कागद रस्त्यावर पडलेला साऱ्यांना दिसला. अजित पवार सहकाऱ्यांना म्हणाले कागद उचलून कचऱ्याच्या पेटीत टाका.. पण सारे म्हटले तो आम्ही टाकलाच नाही.. यांनतर अजित पवारांनी चॉकलेटचा कागद उचलून कचऱ्याच्या पेटीत टाकला होता." ही खरी संस्कृती आहे असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांच्या गुणाचे कौतुक केले. स्वच्छता ही आपली संस्कृती झाली पाहिजे असा सल्ला सुध्दा थोरांतानी उपस्थितींना दिला
स्वच्छता हा अजित पवारांचा गुण
काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांचे वडील आणि अजित पवार यांचे चुलतभाऊ राजेंद्र पवार यांची एक वृत्तवाहिनीला मुलाखत झाली होती. त्यामध्ये त्यांना अजित पवारांबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार यांना खूप स्वच्छता लागते, स्वच्छपणा हा त्यांचा गुण असल्याचे सांगितले होते. कोरोना काळात सुद्धा अजित पवार विशेष काळजी घेताना पाहायला मिळाले होते. प्रसारमाध्यमे असतील किंवा सर्वसामान्य जनता अजितदादा नेहमीच कोरोनाचे नियमांचे पालन करताना दिसले. ठारविक अंतर पाळणे, मास्क घालणे, गर्दी टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टी अजितदादांनी कटाक्षाने पाळल्या.
मेघा कुचिक, मुंबई, झी न्यूज