Pune Crime News : विद्येचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यात (Pune News) गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. दिवसाढवळ्या दहशत माजवण्याच्या दृष्टीने गंभीर गुन्हे केले जात आहेत. अशातच पुणे विद्यापीठातच (Savitribai Phule Pune University) एका विद्यार्थिनीचा विनयभंग (Pune Crime) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाच्या परिसरातच विद्यार्थिनीला शिवीगाळ करत तिचा विनयभंग करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे विद्यापीठातील निवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलानेच हा सर्व प्रकार केला आहे.
आरोपी निवृत्त कर्मचाऱ्याचा मुलगा
पुणे विद्यापीठाच्या आवारात मुलींच्या वसतिगृहाच्या परिसरात एका विद्यार्थिनीला शिवीगाळ करून विनयभंग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विद्यापीठातील निवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दीपक सौंदे असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विद्यार्थीनीच्या विनयभंगानंतर आरोपीने तिथून पळ काढला. आरोपी दीपकचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास पथके रवाना केली आहे.
मित्रासोबत गप्पा मारताना आरोपी आला आणि...
विद्यार्थिनीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तक्रारदार विद्यार्थिनी मुलींच्या वसतिगृहाजवळ मित्राशी गप्पा मारत थांबली होती. मद्यधुंद अवस्थेत असलेला आरोपी सौदे तिथे गेला. त्याने विद्यार्थिनीला शिवीगाळ केली. तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तो पसार झाला. यानंतर घाबरलेल्या विद्यार्थिनीने पोलिसांकडे तक्रार दिली.
तू कोणत्या डिपार्टमेंटची आहेस?
पीडित विद्यार्थिनी अॅल्युमिनी हॉलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर 31 डिसेंबरच्या रात्री गप्पा मारत असताना आरोपी सौदे तिथे आला. यावेळी सौदे याने तू कोणत्या डिपार्टमेंटची आहे, एवढ्या उशिरा काय करते असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच पोलिसाची गाडी बोलावून आतमध्ये टाकेन अशी धमकीही दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.