मुंबई दक्षिण मध्य | लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात काय घडलंय.

Updated: Jun 26, 2018, 05:24 PM IST
मुंबई दक्षिण मध्य | लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार? title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : निवडणुकीच्या आधी प्रचारावेळी समस्या सोडवण्याची मोठमोठी आश्वासनं उमेदवार देतात. पण निवडणुकीनंतर समस्या जैसे थेच राहतात हा बहुतेक मतदारांचा अनुभव. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात काय घडलंय.

गेल्या १० वर्षात धारावीचा पुनर्विकास सरकारी फायलींमध्ये गुदमरून गेलाय. धारावीकरांच्या आयुष्यात कसलंही परिवर्तन नाही. राजकीय नेते आणि विकसकांसाठी धारावी म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी. कुठलीही निवडणूक जवळ आली की राजकीय पक्षांना धारावीची आठवण होते. दर सहा महिन्यांनी धारावी विकासाची टूम निघते. पण प्रत्यक्षात कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काही नाही. 

झोपडपट्टीतला मतदार ते गगनचुंबी इमारतींमध्ये राहणारा उच्चभ्रू मतदार अशी इथं मिश्र लोकवस्ती. ईस्टर्न फ्री वेला लागून असलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजून प्रलंबित असल्याचा आरोप स्थानिक करतात.

उच्चभ्रू भागातले मतदार मात्र शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या कामाबाबत समाधानी आहेत.
स्वतः खासदार राहुल शेवाळे हे आपल्या मतदार संघातील कामाबाबत समाधानी आहेत.

CRZ अटींमुळे प्रलंबित इमारत पुनर्विकास मार्गी लावला.
रेल्वे रुळांलगत असलेल्या झोपड्यांच्या पुनर्विकासाठी धोरण पाठपुरावा
दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नियंत्रणासाठी सोयी सुविधा
BARC-RCF  केंद्रीय कर्मचारी वसाहतीतील नागरी समस्या सोडविल्या
BDD चाळी, धारावी झोपडपट्टी पुनर्विकासासाठी पाठपुरावा.
कोळीवाड्यांच्या विकासासाठी विकास आराखड्यात सूचना.
देवनार डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट ही कामं केल्याचा दावा शेवाळेंचा आहे. 
पण शेवाळे यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्याना हे दावे मान्य नाहीत.

या सगळ्या आरोप- प्रत्यारोपात राहुल शेवाळे यांच्यापुढे निवडणुकीत पुन्हा निवडून येण्याचं आव्हान असणार आहे.

राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेलीत

लोकसभा निवडणुकीत यंदा दक्षिण मध्य मुंबई कोणाची ? याबाबत चुरस असणार आहे. शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्याने इथली राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेलीत.

पूर्वीचा उत्तर-मध्य पण गेल्या लोकसभा निवडणुकीपासून दक्षिण मध्य मुंबई ओळख बनलेला लोकसभा मतदार संघ. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापासून ते अणुशक्ती नगरपर्यंत.दादरच्या उच्चभ्रू शिवाजी पार्क पासून ते चेंबूरमधल्या चाळींपर्यंत अशी मिश्र लोकवस्ती असलेला हा मतदार संघ...शिवसेनेचं मुख्यालय शिवसेना भवनही इथंच. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी ही या लोकसभा मतदार संघाची ओळख. संसदेत सध्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे करतात. मराठी, दलित, गुजराथी, दाक्षिणात्य, मुस्लीम असा इथं भरणा आहे. इथला 60 टक्के मतदार हा झोपडीवासीय आहे.

या मतदार संघात कधीच कुठल्या एका राजकीय पक्षाची मक्तेदारी राहिलेली नाही.
राजकीय संख्याबळ पहिलं तर, शिवसेनेचे 3 आमदार, भाजपाचा एक आमदार आणि काँग्रेसचे दोन आमदार आहेत. 
या मतदार संघात 36 पैकी 21 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. 

दलित आणि मुस्लिम समाजाच्या प्राबल्यामुळे पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेससाठी अनुकूल मानला जायचा. पण नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेत शिवसेनेचे नगरसेवक राहुल शेवाळे महापालिका सभागृहातून थेट संसदेत पोहोचले.

पण आता शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानं इथं राजकीय विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्याहेत. शिवसेना-भाजपमध्ये होणाऱ्या मतविभागणीचा आपल्याला फायदा होईल असा विरोधकांचा अंदाज आहे.

शिवसेना आपल्या स्वबळाच्या भूमिकेवर ठाम राहिली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि विधानपरिषद आमदार प्रसाद लाड इथं भाजपचा चेहरा मानला जातोय. तर या मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं असल्यामुळे सामाजिक न्याय खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे इथं पुन्हा इच्छुक आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या निरीक्षणानुसार दक्षिण मध्य मुंबईत सध्या शिवसेनेचंच पारडं जाड मानलं जातेय.

गेल्या निवडणुकीत भाजपशी असलेल्या युतीचा फायदा दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेला झाला होता. सलग दोन टर्म असलेलं काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढणं शिवसेनेला शक्य झालं होतं. पण स्वबळाच्या धुंदीत या मतदार संघात पुन्हा निर्माण झालेले अस्तित्व पणाला लावण्याचा धोका शिवसेना नेतृत्व पत्करणार का मुद्दा आहे.