शहापूर : रुग्णवाहिका नव्हती म्हणून मृत बाळाला कुशीत घेऊन नातेवाईकांची तीन - साडे तीन तास अक्षरशः फरफट झाली. शहापूरमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. शहापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे या यातना नातेवाईकांना सहन कराव्या लागल्या. डोळखांब दरेवाडी इथे राहणारी १९ वर्षीय महिला प्रसुतीसाठी पहाटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. साडे आठ वाजल्याच्या सुमारास त्यांनी एका मुलाला जन्म दिला... पण कमी दिवस भरल्यामुळे नवजात बालकाला श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे बालकाला खासगी रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र वाटेत बाळाचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, बाळाच्या मृत्यूमुळे आईला आकडी आली. मृत बाळाला घरी बेरवाडी इथे नेण्यासाठी रूग्णवाहिकेची गरज होती. त्यामुळे बाळाला हातात धरून नातेवाईक रूग्णालयासमोर वाट पाहात उभे होते.
मात्र, रुग्णालयाच्या दारात रुग्णवाहिका असूनही ती देण्यास टाळाटाळ होत होती. डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन तासांनंतर रूग्णवाहिका दिली. मात्र तोवर नातेवाईकांची फरफट झाली.