एव्हरेस्टवरचं 'मिशन शौर्य' यशस्वी, एका आदिवासी मुलीनं केलं नेतृत्व

राज्यभरातील नऊ मुलांचा सहभाग असणाऱ्या 'मिशन शौर्य' या मोहिमेचे नेतृत्व एका आदिवासी मुलीनं यशस्वीरित्या करून दाखवलंय 

Updated: May 25, 2019, 04:24 PM IST
एव्हरेस्टवरचं 'मिशन शौर्य' यशस्वी, एका आदिवासी मुलीनं केलं नेतृत्व title=

नाशिक : राज्यातील नऊ आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे. 'मिशन शौर्य' अंतर्गत सहा विद्यार्थी आणि तीन विद्यार्थीनींनी ही एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली. हे सगळे विद्यार्थी १८ ते २० वर्ष वयोगटातील आहे. एकाच मोहिमेत इतक्या कमी वयात एकाच टीमच्या नऊ जणांनी एवरेस्ट सर करण्याची जगातील पहिलीच यशस्वी मोहीम असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. 

जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टवर पाय रोवण्याचे ध्येय बाळगलेल्या नाशिकमधील आदिवासी मुलांनी शुक्रवारी पहाटे शिखर सर केले. उल्लेखनीय म्हणजे, राज्यभरातील नऊ मुलांचा सहभाग असणाऱ्या 'मिशन शौर्य' या मोहिमेचे नेतृत्व करण्याचा मान सुरगाणा तालुक्यातील हस्ते इथल्या हेमलता गायकवाड नावाच्या अकरावीत शिकणाऱ्या आदिवासी मुलीला मिळालाय. नाशिकच्या आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या तीन मुलांनी सहजपणे हे लक्ष्य पूर्ण केले.


मिशन माऊंट एव्हरेस्ट

या चमूत सुरगाणा तालुक्यातील अलगुण आश्रमशाळेत इयत्ता अकरावीमध्ये शिकणाऱ्या हेमलता अंबादास गायकवाड, वाघेरा आश्रमशाळेतील मनोहर गोपाळे हिलीम, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बारीपाडा आश्रमशाळेतील अनिल तुकाराम कदे यांचा समावेश होता. या आदिवासी विद्यार्थ्यांना नागपूरच्या अविनाश देऊस्कर आणि बीमला नेगी देऊस्कर यांचं मार्गदर्शन मिळालं. 

नाशिक जिल्ह्यासह राज्यातील बीड, चंद्रपूर, धुळे अमरावती जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी शिखर सर करत दऱ्या खोऱ्यातील भटकंती थेट एव्हरेस्टपार नेली. शुक्रवारी पहाटे हा विक्रम करत या मुलांनी आता परतीचा प्रवास सुखरूप सुरू केला आहे.