बारामती : विद्याप्रतिष्ठान माहिती व तंत्रज्ञान विभाग संचलित वसुंधरा वाहिनी या रेडियो केंद्राकडून मराठी नव-वर्षाच्या स्वागतासाठी "संस्कृती रॅली" चे आयोजन करण्यात आले. या रॅलीची सुरुवात विद्याप्रतिष्ठान येथील ग. दि .मा सभागृहापासून झाली व बारामती शहरातून मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप विद्याप्रतिष्ठान येथे करण्यात आला. मराठी नव-वर्षा च्या निमित्ताने "संस्कृती रॅली" मध्ये सहभागी होण्याचे आवाहन वाहिनीद्वारे पाच दिवसांपूर्वी करण्यात आले होते.
सध्या तरुणाईमधील दुचाकीची व चार चाकी वाहनांची वाढलेली आवड लक्षात घेऊन सदर रॅलीमध्ये या वाहनांचा समावेश करण्यात आला होता. मराठी सणांच्या साजरीकरणा बरोबरच सामाजिक विचारांची रुजवण या नव-वर्षाच्या सुरुवातीला करावी व सर्वाना एकत्रित आणत हा आनंद साजरा करावा असा या रॅली चा उद्देश होता, असे वाहिनीचे केंद्रप्रमुख युवराज जाधव यांनी सांगितले.
रॅलीमध्ये सहभाग महिलांनी नऊवार साडी व फेटा परिधान करत मराठमोळा पेहराव केला होता. त्याचबरोबर फेटा व झेंडा हाती घेऊन पुरुषांनीही मोठा सहभाग दर्शवला होता. संस्कृती रॅली मध्ये वसुंधरा वाहिनीच्या आवाहनास दाद देत बारामती येथील एकजीव सेवा संघ, भवानीनगर येथील छत्रपती ग्रुप तसेच शरयु टोयोटा कर्माचारी ग्रुप देखील सहभागी झाला होता. सहभागी मधून बेस्ट लूक चे पारितोषिक सीमा घोडके व बेस्ट रायडर चे पारितोषिक रोहित जाधव यांना देण्यात आले. बारामतीत या संस्कृती रॅली चे स्वागत करण्यात आले.
या उपक्रमासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. अमोल गोजे यांचे मार्गदर्शन मिळाले. तर वाहिनीच्या राजश्री नेवसे , स्नेहल कदम, ऋतुजा आगम व स्वाती वीरकर यांनी योगदान दिले.