Maharastra Politics : आज ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा शिवसंकल्प मेळावा आयोजित केला गेला आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच ठाण्यातील वातावरण तणावपूर्ण झाल्याची माहिती मिळतीये. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. तर मनसैनिकांनी आणि शिंदे गटाच्या समर्थकांनी सभास्थळी गोंधळ घातला. शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे ठाण्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर सभागृहाबाहेर मोठा राडा झाल्याची दृष्य समोर आली आहेत.
विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. ठाणे लोकसभेत झालेल्या पराभवानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी शिवसैनिकांना विजयाचा आत्मविश्वास देण्यासाठी मेळावा असल्याचं बोललं जातंय. पण मनसे सैनिकांनी राडा घातल्याने आता वादाला तोंड फुटलंय. काल उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी वादग्रस्त बॅनर (Banner) लावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. अशातच आज पुन्हा मनसे सैनिकांनी राडा घातलाय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बीड दौऱ्यात संकटाचा सामना करावा लागला. शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) कार्यकर्त्यांनी ताफ्यासमोर गोंधळ घातला होता. राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौरा करतायत. यात दोन दिवस ते बीड (Beed दौऱ्यावर होते. राज ठाकरे बीड शहरात ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्या हॉटेलच्या बाहेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. यावेळी राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या देखील टाकण्यात आल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातल्याचं बोललं जातंय.