Maharashtra Weather News : मान्सून 2.0; वादळी वारे अन् विजांचा कडकडाट, परतीच्या पावसानं वाढवली चिंता

Maharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.   

सायली पाटील | Updated: Oct 7, 2024, 07:50 AM IST
Maharashtra Weather News : मान्सून 2.0; वादळी वारे अन् विजांचा कडकडाट, परतीच्या पावसानं वाढवली चिंता  title=
Maharashtra Weather news monsoon return showers will lash out state know details

Maharashtra Weather News : मान्सूनच्या परतीच्या प्रवासादरम्यान आता खऱ्या अर्थानं परतीचा पाऊस राज्य व्यापताना दिसत असून या मोसमी पावसाची दुसरी इनिंग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर हिटमुळं उष्णता दिवसागणिक वाढत असतानाच दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. ज्यामुळं राज्याच्या काही भागांमध्ये परतीच्या पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल असं हवामान विभागानं स्पष्ट करत इथं पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. (Monsoon Return Journey)

सध्या महाराष्ट्रातील नंदुरबार भागातून पावसानं काढता पाय घेतला असताना पुढील 48 तासांमध्येही बहुतांश भागांमध्ये पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळणार आहे. राज्यात वाढता उकाडासुद्धा नाकारता येत नसून बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळं ही स्थिती निर्माण होत असल्याचं सांगितलं जात आहे. 

अधिकृतरित्या सध्या राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पण, बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्यात येत असल्यामुळं बुधवार अर्थात 9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर यादरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात सध्या होणारी वातावरणनिर्मिती पाहता हवेच्या वरच्या स्थरात उष्ण आणि कोरडे उष्ण वारे बाष्पयुक्त वाऱ्यांमध्ये मिसळल्यामुळं ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : मोदी शुद्धीत आहेत ना? ठाकरेंच्या सेनेला पडला प्रश्न; म्हणाले, '5 वर्षात 3000000000000 रुपयांचे...'

 

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारच्या वेळी तापमानातील दाहकता आणखी वाढणार असून, सायंकाळी मात्र काही भागांवर पावसाचा शिडकावा पाहायला मिळू शकतो. IMD च्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. पण, त्या तुलनेत मात्र पावसाचं सरासरी प्रमाण कमी राहणार असल्याचंही आता आयएमडीकडून सांगितलं जात आहे. 

महाराष्ट्रातील पावसावर परिणाम करतोय उत्तरेकडील मान्सून 

सिक्कीम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशातील हिमालयीन क्षेत्र आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये जेव्हाजेव्हा जास्त पावसाची हजेरी असते, तेव्हातेव्हा मध्य भारतात म्हणजेच महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये पावसंच प्रमाण कमी होतं अशी माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे.