Maharashtra Politics : ईडीच्या (ED) कारवाईनंतर तब्बल 21 महिन्यांनंतर कारागृहाबाहेर आलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) शनिवारी नागपुरात (Nagpur News) दाखल झाले. यावेळी पत्रकारांसोबत संवाद साधताना अनिल देशमुख यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. 21 महिन्यांच्या कालावधीत मला व माझ्या कुटुंबीयांना सातत्याने मानसिक त्रास दिला गेला. पण, मला न्याय दिल्याबद्दल मी न्यायदेवतेचे आभार मानतो, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच मला कारागृहात दिलेला प्रस्ताव स्विकारला असता तर महाविकास आघाडीचे सरकार आधीच पडले असते, असा मोठा खुलासा अनिल देशमुख यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर राज्यात मोठं संकट निर्माण झालं होतं. त्यावेळी बंडखोरांनी शिवसेनेने सत्ताधारी महाविकास आघाडी आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली होता. मात्र ती मान्य न झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतला आणि सरकार कोसळलं. यानंतर शिंदे गटाने भाजपच्या मदतीने राज्यात युतीचे सरकार स्थापन केले होते. मात्र अनिल देशमुख यांनी नागपुरात केलेल्या दाव्यामुळे नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
"मला तुरुंगात एक ऑफर आली होती, जी मी नाकारली. जर मी तडजोड केली असती तर महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांपूर्वीच कोसळले होते. पण माझा न्यायावर विश्वास आहे, म्हणून मी सुटकेची वाट पाहत होतो," असा खुलासा अनिल देशमुख यांनी केला.
परमबीर सिंह आणि सचिन वाझेमागे मास्टरमाइंड - अनिल देशमुख
"मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर आढळलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड या प्रकरणांमुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याना मी निलंबित केले होते. त्यामुळे, दोघांनी एकत्र येऊन मला अडचणीत आणण्यासाठी खोटे आरोप केले. दोघांच्या मागे कुणी मास्टरमाइंड आहे," असे अनिल देशमुख म्हणाले.
"परमबीर सिंहांच्या ऐकीव माहितीवरून माझ्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे तथ्यहिन आरोप झाले. पण, हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाने हे आरोप खोटे ठरत आहेत. हायकोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रातही 100 कोटींऐवजी 1.71 कोटी रुपये दाखवले गेले. या आरोपांमागे कोणती शक्ती होती, हे माझ्यापेक्षा पत्रकारांनाच जास्त माहीत होते," असेही अनिल देखमुख म्हणाले.