जालना : लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील रहाणारा शैलेश... आई वडील मोलमजुरी करतात. काही वर्षांपूर्वी त्याचे आईवडील नाशिकमध्ये कामासाठी गेले. शैलेशदेखील त्यांच्यासोबत गेला. या दरम्यान त्याची जुगार खेळणाऱ्या मुलांसोबत मैत्री झाली. तो एका मुलीच्या प्रेमात पडला.
घरच्यांनी लग्नासाठी परवानगी नाकारली. तरीही त्याने प्रेयसीसोबत लग्न केले. तो पुन्हा लातूरमध्ये राहण्यासाठी आला. घर चालवण्यासाठी पैसे नसायचे. प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी त्याने वेगळी शक्कल लढविली.
वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन तो एटीएम बाहेर उभा राहायचा. भोळाभाबडा माणूस एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आला की, त्याला पैसे काढून देतो असं सांगून त्याला पासवर्ड विचारायचा.
त्यानंतर दुसरं एटीएम त्याच्या हातात देऊन त्याच्या एटीएममधून पैसे काढून घेऊन तो लोकांना गंडवायचा. जालन्यातील 4 ते 5 जणांना त्याने अशाच पद्धतीने गंडा घातला होता. याची तक्रार पोलीस ठाण्यात झाली. पोलिसांनी त्याचा माग घेतला. अखेर, एके ठिकाणी पोलीसांनी त्याला अटक केली.
त्याने आपल्या जबानीत आपण हे सारं प्रेयसी पत्नीसाठी करत असल्याचं त्यानं सांगितलं. प्रेयसीला खुश ठेवण्याच्या नादात तो लोकांना गंडवू लागला पण थेट जेलमध्ये पोहोचला.