मुंबई : पुणे महापालिकेत काँग्रेसचे गटनेते आणि सभागृह नेते भाजपचे श्रीनाथ भिमाले यांच्यातील वाद ताजा असतानाच आता भाजपांतर्गत वाद पुढे आला आहे. सत्तेत असूनही विकासकामं होत नाहीत. प्रशासन साथ देत नाही. विरोधात असताना , आंदोलन तरी करता येत होते. सत्तेत असल्यानं तेही करता येत नाही. अशी जाहीर नाराजी भाजप नगरसेवकांनी सभागृहात व्यक्त केली आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमधील वादाची दृष्य समोर आली आहे. पण महापालिकेत वाद फक्त काही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये नाही. तर, सत्ताधारी भाजपमध्ये ही अंतर्गत वाद सुरु झाले आहे.
याला तोंड फोडलंय बाणेर येथील भाजप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी. सत्तेत असूनही विकासकामं होत नाहीत. सत्ताधारी असूनही प्रशासन साथ देत नाही. अशी नाराजी थेट महापालिका सभागृहातच त्यांनी व्यक्त केली. सभागृहात फक्त पुढच्या रांगेत बसणाऱ्यांचीच कामे होतात. अशी तोफही त्यांनी पदाधिकाऱ्यांवर डागली. विरोधात असताना किमान आंदोलन तरी करता येत होते. आता तेही करता येत नाही. अशी खंत व्यक्त करत त्यांनी भाजपाला घराचा आहेर दिला आहे.
प्रभागातील समस्या मांडल्या. प्रश्न विचारले म्हणून बालवडकर यांना चक्क नोटीस बजावण्यात आली आहे. म्हणजे पक्षही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. पुणे भाजपमध्ये पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे असा जाहीर अनेकदा रंगलाय. दोन्ही नेते काही म्हणत असले तरी हा वाद पूर्ण शमलेला नाही. उलट आता तो महापालिकेत पोहचलाय. बालवडकर काकडे गटाचे समजले जातात. त्यामुळंच त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचं बोललं जातंय. महापालिकेतील भाजपचे कारभारी मात्र यावर बोलायला टाळत आहेत.
पुण्यात भाजपाला २०१४ पासून प्रचंड यश मिळालं आहे. आता २०१९ च्या निवडणुका तोंडावर आहेत. अशा वेळी २०१४च्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाला विरोधकांआधी पक्षातील लोकांशीच दोन हात करावे लागण्याची चिन्ह आहेत.