'मुख्यमंत्री' स्टीकर काढून नार्वेकरांनी अजित पवारांना CM च्या खुर्चीत बसवलं; Video चर्चेत

Ajit Pawar Seats On CM Chair: मुंबईमध्ये आज सकाळी 10 वाजता पार पडलेल्या भूमीपूजन सोहळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर नव्हते. मात्र या कार्यक्रमासाठी मंचावर ठेवलेल्या खुर्च्यांमध्ये शिंदेंच्या नावान एक खुर्ची राखीव ठेवण्यात आलेली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 3, 2023, 11:41 AM IST
'मुख्यमंत्री' स्टीकर काढून नार्वेकरांनी अजित पवारांना CM च्या खुर्चीत बसवलं; Video चर्चेत title=
मनोरा निवास भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये घडला हा प्रकार

Ajit Pawar Seats On CM Chair: मागील 3 वर्षांपासून रखडलेल्या मंत्रालयाजवळील मनोरा आमदार निवासाचे भूमिपूजन आज पार पडलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र त्याचवेळी दुसरीकडे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री शिंदेसाठी मंचावर ठेवण्यात आलेल्या खुर्चीवर बसल्याचा व्हिडीओही चांगलाच चर्चेत आहे. विशेष म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीच मुख्यमंत्री शिंदेसाठी राखीव ठेवलेल्या खुर्चीवरील स्टीकर काढलं. हा सर्व घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

नेमकं घडलं काय?

मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ कार्यक्रम आज सकाळी 10 च्या सुमारास पार पडला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गो-हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे आले नाहीत. त्यामुळेच मंचावर मुख्यमंत्री शिंदेंचं नाव असलेली खुर्ची रिकामीच होती. मुख्यमंत्र्यांचं नाव असलेल्या खुर्चीवर उपमुख्यमंत्री अजित पवार बसल्याचं पहायला मिळालं. विशेष म्हणजे शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय हा नार्वेकरांच्या हातीच आहेे. त्यामुळे त्यांनीच हे स्टीकर काढल्याने याचे वेगळे अर्थही काढले जात आहेत.

त्या विधानाशी जोडला जातोय संदर्भ

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील महिन्यामध्येच ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री पदी अजित पवार दिसतील अशा अर्थाचं विधान केलं होतं. त्यामुळे या विधानाशीही या घटनेचा संबंध जोडला जात आहे. एकनाथ शिंदेंच्या नावाचं स्टीकर काढून टाकल्यानंतर त्या खुर्चीवर म्हणजेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उजव्या हाताला अजित पवार बसले. तर डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होते.

कसं असणार मनोरा आमदार निवास

राज्यातील अनेक आमदार हे अधिवेशनासाठी त्यांच्या मतदारसंघातून मुंबईत येतात तेव्हा त्यांना मुंबईत राहण्यासाठी सोय यावी म्हणून मनोरा आमदार निवासाच्या 2 इमारती उभारल्या जाणार आहेत. विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना राहण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या इमारतींपैकी एक 40 मजल्यांची तर दुसरी 28 मजल्यांची असेल. या इमारतीमध्ये आमदारांसाठी जिम, कॅफेटेरिया, हायटेक किचनसारख्या सुविधा उपलब्ध असतील असं सांगण्यात आलं आहे. तसेच या इमारतीमध्ये प्रशस्त सभागृह बांधले जाणार आहे. या दोन्ही इमारतींच्या बांधकामासाठी साधारणपणे 1300 कोटी रुपयांचा खर्च होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील 3 वर्षात म्हणजेच 2026 पर्यंत मनोरा आमदार निवासच्या नव्या इमारतींचं काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. मनोरा आमदार निवासासाठी तब्बल ५.४ एफएसआय देण्यात आला आहे.