गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातल्या चांदनीटोला गावात एका म्हशीनं दोन तोंडांच्या एका रेडकाला जन्म दिला आहे.
गोंदिया जिल्ह्यामधल्या आमगाव तालुक्यातल्या चांदनीटोला गावातले कार्तिक बघाडे यांच्या म्हशीनं या रेडकाला जन्म दिलाय. या रेडकाला दोन तोंडं, चार डोळे, चार शिंगं आणि दोन कान आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या ही एक दूर्मिळ मात्र तरीही सामान्य घटना मानली जाते.
मात्र, अशा आगळ्यावेगळ्या रेडकाच्या जन्माची बातमी समजताच, गावकऱ्यांसह इतर ठिकाणांहूनही या रेडकाला पाहण्यासाठी एकच गर्दी होत आहे. हे कमी म्हणून की काय, चमत्कार समजून गावकऱ्यांनी या रेडकाची चक्क पूजाही केली.
दरम्यान म्हशीच्या शरीरातल्या हार्मोन्सचं संतुलन बिघडल्यामुळे असं रेडकू जन्माला आल्याचं, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय. हा कुठलाही चमत्कार नसून म्हशीला झालेल्या विशिष्ट आजारामुळे असं रेडकू जन्माला आल्याचं सांगण्यात आलंय.