अनिरुद्ध दवाळे, अमरावती, झी मीडिया : राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभरातून त्यांच्याविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यात काही जणांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करत त्यांच्या विधानाचा निषेध नोंदवला होता. त्यानंतर सोमवारी चंद्रकांत पाटील यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र काही भाजपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी ओघाच्या भरात सरकार विरोधातच घोषणाबाजी केली. (BJP sloganeering against own government)
अमरावती शहर भाजपातर्फे अमरावतीच्या राजकमल चौकात उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांच्या समर्थनार्थ व शाईफेकीच्या घटनेचा निषेध करण्याकरता भाजपा अमरावती शाखेच्यावतीने काल आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाकरीता शहर अध्यक्ष, भाजप प्रवक्ते व सर्व माजी नगरसेवक हे आंदोलनासाठी जमले होते. त्यानंतर मोठ्या जोशात आंदोलन सुरू ही झाले. मात्र आंदोलनात घोषणा काय द्यायच्या हे काही माजी नगरसेवकांच्या लक्षातच आले नाही.
या सरकारचे करायच काय??
त्यावेळी भाजपच्या माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे यांनी "या सरकारचे करायच काय" असा नारा दिला. यावेळी बाकीचांनी लगेचच खाली डोके वरती पाय असा असे म्हटले. मात्र ही चूक लगेचच लक्षात आल्याने इतर भाजप पदाधिकाऱ्यांनी लुंगारे ताईंना आवर घातला. तसेच दुसऱ्या घोषणा देण्यास सुरुवात केली. या घोषणांमुळे परिसरात एकाच हशा पिकाला होता.
चंद्रकांत पाटील यांचा जाहीर माफीनामा!
चंद्रकांत पाटील यांनी महापुरूषांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत सोमवारी निवेदन जारी करत माफी मागितली आहे. "माझा कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता, महापुरूषांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटतं," असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
#Newsinshort
कहना क्या चाहते थें... सत्तेत असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या सरकारविरोधात घोषणा.. पाहावे ते नवलच#म #मराठी #अमरावती pic.twitter.com/ZLDAKO8t2B— Pratiksha Bansode (@pratikshapb) December 13, 2022
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
"सरकारवर अवलंबून का राहताय? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या देशात शाळा सुरु केल्या. या सर्वांना शाळा सुरु करताना सरकारने अनुदान नाही दिलं. यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरु करायचीय आम्हाला पैसे द्या. तेव्हा 10 रुपये देणारे होते. 10 कोटी देणार लोक आहेत ना," असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.