नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. एका अवघ्या दीड वर्षांच्या चिमुरड्यानं सापाला खेळणं समजून चावून चावून ठार केल्याचं उघडकीस येतंय.
ही बातमी वाचून तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील. पण, आसफाबाद गावात ही घटना घडलीय. रविवारी सकाळी जवळपास आठ वाजता ही घटना घडल्याचं समजतंय.
रविवारी सकाळी आपल्या घराच्या अंगणात हा चिमुरडा खेळत होता. कुटुंबीय कामात व्यस्त होते... तेवढ्यात एक ५ फूट लांब साप घरात घुसला. अतिशय विषारी असा हा 'वूल्फ' साफ होता. खेळणं समजून या चिमुरड्यानं सापाला हातात घेतलं... आणि सवयीप्रमाणे त्याच्या शेपटाकडील भागाला तोंडात घातलं... आणि चावलंही! त्यानंतर साप मरण पावला.
थोड्यावेळानं कुटुंबीय तिथं दाखल झाले तेव्हा चिमुरड्याच्या हातात साप पाहून त्यांना धक्काच बसला. घाबरत घाबरत त्यांना सापाला हात लावला तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी चिमुरड्याला उचलून घेतलं... तर त्याला मात्र काहीच झालं नव्हतं. चिमुरड्यानं चावा घेतल्यानंतरही या सापानं त्याला दंश केला नव्हता.
कुटुंबीय मुलाला डॉक्टरकडे तपासणीसाठी घेऊन गेले... तेव्हा डॉक्टरांनीही त्याला काहीच झालं नसल्याचा निर्वाळा दिला.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सापाचा मृत्यू दोन कारणांमुळे होऊ शकतो. एक म्हणजे मानेवर खूप घट्ट पकडल्यानं त्याचा श्वास कोंडून त्याचा मृत्यू झाला असावा किंवा मुलाचे दात शरीरात घुसल्यानं सापाच्या हृदयावर दबाव पडल्यानंही त्याचा मृत्यू झाला असावा.