नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राज्यसभेला संबोधित केले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह जम्मू-काश्मीरमधील चार राज्यसभेच्या खासदारांना त्यांची मुदत संपल्यानंतर निरोप देण्यात आला. पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचं खूप कौतुक केले आणि एका दहशतवादी घटनेचा संदर्भ देताना ते भावनिक झाले. पंतप्रधान म्हणाले की ,श्री गुलाम नबी आझाद जी, श्री शमशेरसिंह जी, मीर मोहम्मद फयाज जी, नादिर अहमद जी, आपण चारही जणांनी या सदनाचा गौरव, तुमचा अनुभव आणि तुमच्या ज्ञानाचा देशाला लाभ दिल्यामुळे तसेच तुमच्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी तुमचे मनापासून धन्यवाद करतो.'
पीएम मोदी यावेळी म्हणाले, 'मला चिंता आहे की गुलाम नबीजीनंतर जो कोणी हा पदभार स्वीकारेल त्याला गुलाम नबीजी यांच्यासारखं बनता येईल का? त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागेल. कारण ते पक्षासोबतच सदन आणि देशाची देखील चिंता करायचे.'
पीएम मोदी म्हणाले की, गुलाम नबी जी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मी देखील एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. आम्ही खूप जवळ होतो. एकदा गुजरातमधील काही प्रवाशांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा तिथे 8 लोकांचा मृत्यू झाला होता. मला प्रथम गुलाम नबीजींचा फोन आला. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. प्रणव मुखर्जी त्यावेळी संरक्षणमंत्री होते. मी त्यांना सांगितले की मृतदेह आणण्यासाठी सैन्याचं विमान मिळालं तर बरं होईल. त्यावर लगेच त्यांनी म्हटलं की, काळजी करू नका, मी व्यवस्था करतो. गुलाम नबी जी त्या रात्री विमानतळावर होते, त्यांनी मला फोन केला आणि आपल्या कुटुंबातील सदस्याबद्दल काळजी करतो तसे ते काळजी करत होते.'