नवी दिल्ली : महाआघाडी सोडून नितीश कुमार यांनी भाजपशी नवा दोस्ताना केला. त्यानंतर बिहारमधले राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. जनता दलाचे लालू प्रसाद यादव आणि जनता दल युनायटेडचे नितीश कुमार यांच्यात तर, खास बिहारी स्टाईल कलगीतुरा रंगला आहे. हा कलगीतुरा इतका मनोरंजक ठराला आहे की, एका टीकेला प्रत्युत्तर देताना नितीश यांनी लालू प्रसाद यादव यांना चक्क 'डार्लिंग' म्हटले आहे.
दरम्यान, लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे की, 'चर्चेत राहण्यासाठी लालू प्रसाद यादव हे मुद्दाम वेगवेगळी विधाने करत आहेत'. पाटण्याताली एका कार्यक्रमात बोलताना नितीश कुमार यांनी केंद्रात झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य केले. 'केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत संयुक्त जनता दलाला ना इच्छा होती, ना आपेक्षा. मात्र, हा मुद्दा कारणाशिवाय उपस्थित करत काही लोक अनेक प्रकारची वक्तव्ये करत आहेत. जेव्हा प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होऊ लागली तेव्हा आपले 'डार्लिंग' बनलेल्या लोकांनाही बोलण्याची संधी मिळाली', असा टोलाही नितीश यांनी लालूंना लगावला.
दरम्यान, 'मीडियाचे डार्लिंग बनलेले लालू प्रसाद यांचे आता कोणी ऐकत नाही. त्यांना जे बोलायचे आहे ते बोलूदे. आम्ही बिहारच्या विकासासाठी, प्रगतीसाठी कटीबद्ध आहोत', असेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे. नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरून लालूंनी नितीश यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्याल प्रत्युत्तर देताना नितीश यांनी हा टोला लगावला आहे.