देशातील निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन

कोलकाता येथे निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ देशातील निवासी डॉक्टरांनी आज कामबंद आंदोलन पुकारलं आहे. 

Updated: Jun 14, 2019, 11:37 AM IST
देशातील निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन title=

कोलकाता : कोलकाता येथे निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ देशातील निवासी डॉक्टरांनी आज कामबंद आंदोलन पुकारलं आहे. महाराष्ट्रातील मार्ड संघटनाही त्यात सहभागी असेल. राज्यभरातील २ हजार निवासी डॉक्टर आज कामबंद आंदोलनात सहभागी होणार आहेत. आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्याचं आश्वासन मार्डनं दिलं आहे. मात्र तरी देखील या आंदोलनाचा पालिका आणि सरकारी रुग्णालयांतल्या आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत वारंवार आवाज उठवूनही सरकार दुर्लक्ष करतं. रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांचा अभाव, जमावाला रोखण्यासाठी साधनांची कमतरता यामुळे काही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आहे मात्र ती दुबळी आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेबाबतच्या सरकारच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचं मार्डनं म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये कनिष्ठ डॉक्टरांच्या संपाचा आज तिसरा दिवस असल्यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या संपामागे भाजप आणि माकपाचा हात असल्याचा आरोप केला असून डॉक्टरांनी तातडीनं कामावर रुजू व्हावं, असे आदेश दिले आहेत. 

रुग्णालयाच्या आवारांमध्ये बाहेरचे लोक येऊन संप चिघळवत असून हे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप ममतांनी केला आहे. कोलकात्याच्या एसएसकेएम रुग्णालयात दुपारी ममता पोहोचल्या आणि डॉक्टरांनी तातडीनं कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. मात्र संपकरी डॉक्टरांनी हे आदेश धुडकावून लावत मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे.