नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कोरोना वॅक्सीनशी संबंधित एक वक्तव्य केलं आहे. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे की, नवीन वर्षात पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यापर्यंत कोरोनाची लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात देशातील २० ते ३० कोटी लोकांना ही लस दिली जाणार आहे. ही लस जरी आज हातात आलेली नसली, तरी ही लस कशी वितरीत केली जाईल, लोकांपर्यंत कशी पोहोचवली जाईल, याचं नियोजन करणे सुरु झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.
ही लस लोकांपर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना देखील प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ही लस गावोगावी कशी पोहोचवायची. ती पोहोचवताना, ठेवताना कोणत्या वातावरणात, किता तापमानात ठेवायची. यासाठी कोल्डस्टोरेज किती प्रमाणात लागेल, याचे नियोजन आणि प्रमाण किती असेल, किती गरज असेल, याचा देखील आतापासून आढावा घेतला जात असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन वर्ष २०२१ मध्ये फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत ही लस लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. सुरुवातीला ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत २० ते ३० कोटी लोकांपर्यंत ही लस पोहोचवण्याचं लक्ष्य आखण्यात आलं आहे. ही लस प्राधान्याने कुणाला देण्यात येईल, याविषयी कोणतीही माहिती अजून सरकारकडून देण्यात आलेली नाही.