Taxation System: करदात्यांसाठी खुशखबर, करप्रणालीतील सुधारांबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

पारदर्शक करप्रणालीवर विश्वास, आयटी रिटर्न भरण्याचं प्रमाण वाढलं

Updated: Aug 9, 2022, 04:39 PM IST
Taxation System: करदात्यांसाठी खुशखबर, करप्रणालीतील सुधारांबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा title=

FM On Income Tax: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी करप्रणाली योजनेबाबत (Taxation System) मोठी घोषणा केली आहे. सरकारने सुरू केलेल्या पारदर्शक करप्रणालीमुळे चांगलं संकलन झालं आहे आणि रिटर्न भरण्याचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या आर्थिक वर्षात 14 लाख कोटींहून अधिक महसूल गोळा केल्याबद्दल अर्थमंत्र्यांनी विभागाचं कौतुक केलं. अर्थमंत्र्यांनी जनतेला केलेल्या आवाहनाचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. 

या वर्षी विक्रमी वसूली
सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात झालेलं जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या तुलनेत 28 टक्के वाढलं आहे. (GST Collection in June 2022) जीएसटी संकलनातून जुलै महिन्यात सरकारी तिजोरीत 1,48,995 करोड जमा झाले आहेत. तर मागच्या महिन्यात GST संकलन 1,44,616 करोड झालं झालं होतं. 

त्रुटी दूर करण्यात आल्या
विशेष म्हणजे 2021-22 मध्ये प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक आधारावर 49.02 टक्क्यांनी वाढून 14.09 लाख कोटी रुपये झालं आहे. सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 14.20 लाख कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष कर संकलनाचं उद्दिष्ट ठेवलं होतं. सरकारने अनेक प्रलंबित समस्यांचे निराकरण केले आहे आणि प्रत्यक्ष करांशी संबंधित पायाभूत त्रुटी दूर केल्या आहेत. सरकारने अलीकडच्या काळात केलेल्या सुधारणांमुळे करप्रणाली पारदर्शक झाली असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

आयकर रिटर्नची संख्या वाढली
करदात्यांनी पारदर्शक करप्रणालीवर विश्वास दाखवला आहे, त्यामुळे आयटी रिटर्नच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. इतकंच नाही तर करदात्याची सेवा आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी, विभागीय प्रक्रियांना गती देण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

विभागाने केले सकारात्मक बदल
कर विभागाची जबाबदारी केवळ कार्यक्षम आणि प्रभावी कर प्रशासनापुरती मर्यादित नसून, प्रामाणिक करदात्यांना सन्मानित करण्याचीही जबाबदारी असल्याचं अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितलं.