मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती. १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी डॉ. आंबेडकरांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केला. तळागाळातील लोकांना बौद्धिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन समानतेचा मंत्र देणारे दीपस्तंभ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
गरीबी, निरक्षरता ही गुलामगिरीची मूळ कारणं असल्यानं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र त्यांनी दिला. पाच हजार वर्षांपासून अमानुष, लाचारीचे जीवन जगणाऱ्या जनमानसात आत्मसन्मानाची आणि अस्मितेची ज्योत पेटवणाऱ्या महामानवाला झी २४ तासचाही सलाम...
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती देशभरात उत्साहात साजरी होत आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवर भीम अनुयायींची गर्दी पाहायला मिळत आहे. मनमाड शहरातही जयंतीला जल्लोषात सुरुवात झाली. मध्यरात्री डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अवघा निळा सागर लोटला होता. रात्री १२ ठोक्याला भीम अनुयायांनी ढोल ताश्यांच्या गजरात मध्यवर्ती डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ जमत लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या. मनमाड शहर आंबेडकरी चळवळीचा बाल्लेकिल्ला मानला जात जातो. डॉ. आंबेडकरांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात येते.