बारामतीची जागा जिंकण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने कसली कंबर

बारामतीची जागा कोण जिंकणार याबाबत राज्यात उत्सुकता

Updated: Apr 19, 2019, 06:14 PM IST
बारामतीची जागा जिंकण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने कसली कंबर title=

जावेद मुलाणी, बारामती : कोण होणार बारामतीचा खासदार, या मुद्द्याची राज्यात सर्वाधिक चर्चा आहे. पवार बालेकिल्ला राखणार की बारामतीत इतिहास घडणार, याची प्रचंड उत्सुकता आहे. बारामतीची जागा जिंकायचीच म्हणून भाजपचे तमाम मल्ल अंगाला तेल लावून सज्ज झाले आहेत. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातली लढाई कधी नव्हे एवढी चुरशीची झाली आहे. सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल यांच्यात येथे थेट लढाई आहे. 

खरं तर या मतदारसंघात शरद पवार एकच सांगता सभा घ्यायचे. पण यंदा शरद पवारांच्या बारामती मतदारसंघातल्या सभा वाढल्या आहेत. अजित पवार दिवसाला सहा-सात सभा घेत आहेत. तर सुप्रिया सुळे दिवसभरात तीस गावांना भेटी देत आहेत. पण त्यांना विजयाची खात्री आहे. 

यंदा बारामतीत कमळ फुलवायचंच म्हणून चंद्रकांत पाटील गेले कित्येक दिवस बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्र्यांसह तमाम नेते सभा घेऊन बारामती पिंजून काढत आहेत. बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे २, काँग्रेसचा १, भाजपा, शिवसेना आणि रासपाचा प्रत्येकी एक आमदार आहे. काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील आणि संग्राम थोपटे नाराज असल्याची चर्चा आहे. 

गेल्या वेळी रासपचे महादेव जानकर फक्त तीस हजार मतांनी पडले होते. त्यांनी कमळ चिन्ह घेतलं असतं तर बारामतीचा निकाल वेगळा लागला असता असं बोललं जातं. आता या सगळ्या परिस्थितीत बारामतीचा निकाल काय लागणार, याकडे तमाम देशाचं लक्ष लागलं आहे.

>