मुंबई : 5g Spectrum Auction Update | देशात हाय-स्पीड इंटरनेट सेवा देण्यासाठी 5G स्पेक्ट्रमचा लिलाव चौथ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सुरू आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, लिलावाच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत एकूण 1,49,623 कोटी रुपयांच्या बोली प्राप्त झाल्या आहेत. त्यात देशातील अनेक दिग्गज उद्योगपतींचा समावेश आहे.
मुकेश अंबानींचा रिलायन्स जिओ, सुनील भारती मित्तलची भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि गौतम अदानी यांची प्रमुख युनिट अदानी एंटरप्रायझेस 5G स्पेक्ट्रमच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलावाचा तिसरा दिवस संपेपर्यंत एकूण 1,49,623 कोटी रुपयांच्या बोली प्राप्त झाल्या आहेत. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी झालेल्या नवव्या फेरीनंतर मिळालेल्या 149454 कोटी रुपयांपेक्षा हे किरकोळ जास्त आहे.
जाणून घ्या सरकार काय म्हणाले?
5G स्पेक्ट्रमच्या लिलावाबाबत सरकारने म्हटले आहे की लिलावाला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला असून 2015 ची विक्रमी पातळी ओलांडली आहे. यापूर्वी 2015 मध्ये स्पेक्ट्रम लिलावातून 1.09 लाख कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला होता. मात्र, या प्रक्रियेअंतर्गत लिलाव पूर्ण होईपर्यंत कोणत्या कंपनीला किती स्पेक्ट्रम मिळाले हे कळणार नाही.
शर्यतीत कोण?
लिलावामध्ये 600, 700, 800, 900, 1800, 2100, 2300, 2500, 3300 MHz आणि 26 GHz बँड समाविष्ट आहेत. शर्यतीतील चार मोठ्या कंपन्यांनी एकत्रितपणे अर्नेस्ट मनी डिपॉझिट (EMD) मध्ये 21,400 कोटी रुपये जमा केले आहेत.
रिलायन्स जिओ इन्फोकॉमने 14,000 रुपये ईएमडी जमा केले आहेत तर भारती एअरटेलने 5,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 4G स्पेक्ट्रमसाठी 2021 च्या लिलावात, रिलायन्स जिओने 77.9 टक्के ठेवी वापरल्या तर एअरटेलने 87.7 टक्के वापरल्या.