केरळ : भारतात कोरोनाचं संकट अजून संपलेलं नाही. असं असतानाच अजून एका आजाराने डोकं वर काढलं आहे. केरळमधील वायनाड जिल्ह्यात मंकी फीवर म्हणजेच माकडतापाची प्रकरणं समोर आली आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती देण्यात आली आहे.
केरळच्या वायनाड जिल्ह्यातील थिरुन्नेल्ली ग्राम पंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पनवेली आदिवासी वस्तीमध्ये 24 वर्षीय व्यक्तीला क्यासनुर फॉरेस्ट डिसिजची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याला बोली भाषेत माकडताप असं म्हटलं जातं.
जिल्हा चिकित्सक अधिकारी डॉ. सकीना यांनी सांगितलं की, आरोग्य अधिकाऱ्यांनी Seasonal Fever संदर्भात अलर्ट जारी केला आहे. यावेळी स्थानिक लोकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डॉ. सकीना यांच्या सांगण्यानुसार, माकडतापाने ग्रस्त तरूणाला मनंथवाडी चिकित्सा महाविद्यालयात भर्ती करण्यात आलं आहे. सध्या या तरूणावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. त्याची तब्येत आता उत्तम असून इतर कोणीही या तापाने ग्रस्त असल्याची माहिती नाही.
यावर्षी माकडतापाचा हा पहिला रूग्ण सापडला आहे. हा आजार माकडांपासून व्यक्तींमध्ये पसरू शकतो.