नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठा प्रमाणात होत आहे. कोरोना व्हायरसबाबत संपूर्ण देशभरात अनेक प्रकारच्या सूचना देण्यात येत आहेत. सरकारकडून नागरिकांना घाबरुन न जाता, काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. या व्हायरसपासून स्वत:चा बचाव करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण आता यादरम्यान, औषधांबाबतही इशारा देण्यात आला आहे. डॉक्टरही ही औषधं घातक ठरु शकत असल्याचं मानतं आहेत.
चुकूनही खाऊ नका ब्रूफेन -
जगभरातील डॉक्टर आणि वैज्ञानिक लोकांना, कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणं दिसल्यास ब्रूफेनपासून दूर राहण्याचा सल्ला देत आहेत. फ्रान्सच्या आरोग्य मंत्र्यांनीही, कोरोना व्हायरसची लक्षणं दिसल्यास, ब्रूफेन खाल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. ब्रूफेन खाल्यानंतर रुग्णाची तब्येत अधिक ढासळल्याची शक्यता आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ताप आल्यास केवळ पॅरासिटामोल घेणं योग्य आहे. कोरोना व्हायरससारख्या संसर्गामध्ये ऍन्टी-इन्फ्लेमेट्री औषधं घेणं टाळणं पाहिजे.
माजी राष्ट्रपतींचे चिकित्सक मोहसिन वली यांनी, सर्दी-खोकला, ताप आल्यास स्वत:हून औषधं न घेण्याचा सल्ला दिला आहे. अशावेळी तापाच्या कोणत्याही लक्षणांमध्ये डॉक्टरांशी संपर्क साधूनच औषधं घेणं गरजेचं आहे.
भारतात आतापर्यंत १२७ कोरोनाग्रस्तांची प्रकरणं समोर आली आहेत. त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक ३९ कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. केरळमध्ये आतापर्यंत २२ तर, उत्तर प्रदेशमध्ये १७ प्रकरणं समोर आली आहेत.