मुंबई : रविवारी सकाळी भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. दीदींच्या जाण्याची बातमी कळली आणि सारा देश हळहळला. भावना कशा व्यक्त कराव्यात हेच अनेकांना कळेना. कोणाचे शब्द संपले, कोणाचा कंठ कोरडा झाला आणि कोण स्तब्ध झालं. दीदींच्या जाण्यानं अशीच सर्वांची अवस्था झाली. दीदींच्या निधनानंतर 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. (Lata Mangeshkar)
ज्यांना दीदींची भेट घेण्याची संधी मिळाली त्या सर्वांनीच या अनमोल भेटीच्या आठवणी सर्वांपर्यंत आणल्या. दीदींची कधीही न पाहिलेली रुपं सर्वांना पाहायला मिळाली.
यातीलच एक रुप होतं, हातात रिव्हॉल्वर असणाऱ्या दीदी. दीदी काही मालिका आवडीनं पाहायच्या असं म्हटलं जातं. CID ही त्यापैकीच एक मालिका. जी मालिका पाहून दीदींनी चक्क एसीपी प्रद्युम्न, अर्थात अभिनेते शिवाजी साटम यांच्यावरच बंदूक धरली होती.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोमध्ये दीदी शिवाजी साटम यांच्यावर बंदूक रोखून दिसत आहेत. बरं, दीदींना पाहून साटमही हँड्स अप, करताना दिसत आहेत.
दीदी आणि साटम यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद यावेळी पाहण्याजोगा आहे. शिवाजी साटम यांच्या वाढदिवसाच्याच दिवशी दीदींच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला होता.
2001 मध्ये गानकोकिळा लता मंगेशकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार, अर्थात भारत रत्ननं सन्मानित करण्यात आलं होतं. विविधभाषांमध्ये दीदींनी गाणी गायली. दादासाहेब फाळके पुरस्कार, फ्रांसचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही त्यांच्या नावे समर्पित करण्यात आला होता.
1948 पासून 1974 पर्यंत लतादीदींनी 25 हजारांहून अधिक गाणी गायली. जी कामगिरी पाहता सर्वाधिक गाणी गाणाऱ्या या गायिकेचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं.