मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबात एक असं वळण आलं, जे पाहून अनेकांनाच नात्यांचे खरे बंध काय असतात याची सुरेख झलक पाहता आली. बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीची मुलं अभिनेता अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर यांनी अडचणीच्या वेळी आपल्या सावत्र बहिणींना म्हणजे जान्हवी आणि खुशी कपूर यांना आधार दिल्याचं पाहायला मिळालं.
सुरुवातीच्या काळात अर्जुनचं जान्हवी, खुशी आणि आपल्या वडिलांच्या म्हणजे बोनी कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी श्रीदेवी यांच्यासोबतचं नातं हे फारचं चांगलं नव्हत. पण, परिस्थिती बदलण्यास फार वेळ लागला नाही.
बहिणींसोबतच्या याच नात्याविषयी अर्जुनने एका मुलाखतीत आपले विचार मांडले आहेत.
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबतच खुशी आणि जान्हवीसोबत असणारं माझं नातं अधिकच दृढ होत असल्याचं त्याने 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
'आमच्या कुटुंबात कोणता वाद नाही. पण, माझं कुटुंब हे हसतंखेळतं कुटुंब आहे, असा दिखावाही मी कधीच केला नाही. माझी इतकीच इच्छा आहे की माझं कुटुंब, बहिणी आनंदात असाव्यात. वडिलांसाठी एक चांगला मुलगा असण्याचाच मी प्रयत्न करत आहे', असं तो म्हणाला.
जान्हवी आणि खुशी आपल्याला बहिणी म्हणून संबोधण्याची परवानही देतात हे त्यांचं मोठेपणच आहे, असं म्हणत त्याने एक भाऊ म्हणून कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
जान्हवीच्या चित्रपट कारकिर्दीत एक मोठा भाऊ म्हणूनही ती तो नेहमीच तिला मार्गदर्शन करतो. एखाद्या कामासाठी प्रेक्षकांनी जर आपल्यावर टीका केली तर, चुका स्वीकारत त्यात काही महत्त्वाचे बदल करण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला त्याने तिला दिला आहे.
येत्या काळात 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्येही ही भाऊ-बहिणीची जोडी झळकणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला जान्हवीसोबत अधिकाधिक वेळ व्यतीत करण्याची संधी मिळाली असंच अर्जुनने सांगितलं. त्यामुळे एक अभिनेता, भाऊ, मुलगा म्हणऊन अर्जुन त्याच्या सर्व जबाबदाऱ्या अगदी योग्यपणे पार पडत आहे, असं म्हणायला हरकत नाही.