जोधपूर : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या नात्याची चर्चा आता सर्वदूर पसरली आहे. हे दोघंही या नात्यासाठी कधीच नकारही देताना दिसत नाहीत. अशातच आता या जोडीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जिथं आलिया काहीशी अडचणीत दिसत असून, तिला आधार देण्यासाठी म्हणून रणबीरनं धाव घेतल्याचं पाहायला मिळत आहे. आलियाची अवस्था पाहून रणबीरनं केलेली कृती सर्वांचंच मन जिंकून जात आहे.
रणबीरच्या बर्थडे सेलिब्रेशननंतर आलियासह तो बुधवारी मुंबईत परतला. यावेळी या स्टार जोडीला जोधपूर विमानतळावर चाहत्यांनी घेरलं. कोणी त्यांच्यासोबत सेल्फी घेताना दिसलं, तर कोणी त्यांच्या जवळ येताना दिसलं. गर्दी पाहून आलिया काहीशी गोंधळली. तिला पाहून रणबीरनं लगेचच तिच्या मदतीसाठी पुढे जात गर्दीपासून तिचा बचाव केला. ज्यानंतर गर्दीतूनच वाट काढ हे दोघंही विमानतळात गेले.
सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर आणि आलिया वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सुजान जवाई रिसॉर्टला पोहोचले होते. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा रिसॉर्ट 1 ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
आलियानं यंदाच्या वर्षी रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. जिथं एका मोठ्या जलाशयाच्या काठावर बसून हे दोघंही सूर्यास्ताच्या रंगांची उधळण अनुभवताना दिसले. 2021 मध्ये रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाबाबत नेमक्या कोणत्या चर्चा पाहायला मिळतात किंवा ही जोडी खरंच लग्नगाठ बांधते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.