मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्यावतीने चर्चा केली आणि कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहोचणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली.
#MPSC ची २० सप्टेंबर रोजी विविध पदांसाठी होणारी भरती परीक्षा आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाणार. #COVID_19 च्या परिस्थितीमुळे विधानसभा अध्यक्ष @NANA_PATOLE यांच्या सूचनेची होणार अंमलबजावणी. pic.twitter.com/9JQQEEzI6i
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 13, 2020
अखेर २० सप्टेंबर २०२० रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची अडचण दूर केल्याने राज्याच्या सर्व विभागातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. अनेक उमेदवारांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांचे आभार मानले आहेत.
परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो असेही स्पष्ट करण्यात आले आहे.