Uttar Pradesh Elections 2022 | यूपीच्या ( up ) आखाड्यात उमेदवारीचा नवा पॅटर्न काँग्रेसला ( congress ) फायदेशीर ठरेल?

उमेदवार निवडताना काँग्रेसनं नवा प्रयोग केलाय. काँग्रेसने हा प्रयोग कशामुळे केला याची चर्चा करु.

Updated: Jan 17, 2022, 09:38 PM IST
Uttar Pradesh Elections 2022 | यूपीच्या ( up ) आखाड्यात उमेदवारीचा नवा पॅटर्न काँग्रेसला ( congress ) फायदेशीर ठरेल? title=

धनंजय शेळके, प्रतिनिधी, झी २४ तास, मुंबई : आजच्या जमान्यात निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व प्रकारांचा राजकीय पक्षांकडून वापर केला जातो. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून उमेदवार निवडताना निवडून येण्याची क्षमता हा शब्द सर्रासपणे वापरला जातो आणि ती क्षमता असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी दिली जाते. मग, तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असो, भ्रष्टाचाराचे आरोप असो वा काही अन्य आरोप असो. निवडून येण्याची क्षमता याच निकषावर उमेदवारी दिली जाते. याला कोणताही पक्ष अपवाद नाही.

निवडणूक लोकसभेची असो वा विधानसभेची काँग्रेस पक्षानंही आजपर्यंत अशाच निकषावर तिकीट वाटप केल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, यंदाच्या यूपी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पहिल्या यादीवर नजर टाकल्यास निवडणूक येण्याची क्षमता हा निकष काँग्रेसनं फारसा पाळला नसल्याचं दिसून येतंय. उमेदवार निवडताना काँग्रेसनं नवा प्रयोग केलाय. काँग्रेसने हा प्रयोग कशामुळे केला याची चर्चा करुच पण, आधी काँग्रेसच्या उमेदवार यादीतील काही उमेदवारांवर एक कटाक्ष टाकू...

काँग्रेसच्या उमेदवारीची वैशिष्ट्य
१) काँग्रेसनं १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये तब्बल ५० महिला म्हणजे ४० टक्के महिलांना तिकीटे देण्यात आली आहेत.
२) उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला उन्नाव विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. भाजपचा तिथला आमदार कुलदीप सेंगर याच्यावर बलात्काराचा आरोप होता. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
३) पूनम पांडे नावाच्या आशा वर्करला तिकीट देण्यात आलं आहे.
४) सदर जाफर नावाच्या अभिनेता कार्यकर्त्याला काँग्रेसनं तिकीट दिलं आहे. CAA-NRC च्या विरोधात फेसबूक लाईव्ह करताना त्यांना अटक करण्यात आली होती.
५) रितू सिंग नावाच्या पूर्वी सपामध्ये असलेल्या कार्यकर्तीला तिकीट दिलं आहे. लखीमपूर खेरीमध्ये तिला रिंगणात उतरवण्यात आलं आहे.
६) निदा अहमद या टीव्ही अँकरला तिकीट देण्यात आलं आहे. अनेक राष्ट्रीय चॅनलमध्ये त्यांनी नोकरी केली आहे.

काँग्रेसनं असं का केलं ?
मग प्रश्न पडतो. आजपर्यंत काँग्रेसनंही केवळ निवडून येण्याची क्षमता हा निकष वापरला. पण, यंदाच्या यूपी निवडणुकीत तो का वापरला नाही. निदान पहिल्या यादीवर नजर टाकल्यास तर तसंच वाटतंय. याची वेगवेगळी कारणं आहेत. उत्तर प्रदेशात काँग्रेसचं संघटन खिळखिळं झालेलं आहे. त्यामुळे निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवारच काँग्रेसकडे नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे निवडून आली नाही तरी भविष्यातील पक्षाची नव्याने बांधणी म्हणून काँग्रेसनं हा नवा प्रयोग केल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत काँग्रेसला हा नवा प्रयोग कितपत उभारी देतो ते निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. पण, मग हाच फॉर्म्युला काँग्रेस देशभरात वापरणार का याची उत्सुकता लागली आहे.