मांसाहारी मंडळी जितक्या आवडीनं मटण, मासे, चिकनवर ताव मारतात अगदी तसाच ताव शाकाहारी मंडळी मशरुमवर मारतात. पण, ही भाजी आहे की मांस अर्थात मशरुम शाकाहारी आहेत की मांसाहारी हेच अनेकांना ठाऊक नाही.
मशरुम एक वनस्पतीही नाही आणि एक प्राणीही नाही. ही आहे एक प्रकारची बुरशी. माती किंवा लाकडातून ही बुरशी तयार होते. एखाद्या कुजणाऱ्या वस्तुमधून मशरुम जगण्यासाठी पोषक तत्त्वं मिळवतात.
मशरुममध्ये प्रोटीन, विटामिन आणि मिनरल्सचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळं त्याची चव मांसाहारी पदार्थांसारखी भासते, पण त्याची उत्पत्ती कोणत्याही प्राण्यापासून होत नाही.
अनेकजण मशरुम मांसाहारी भासत असल्यानं तो खात नाहीत. पण, वैज्ञानिक कारणमीमांसेनंतर तो शाकाहारामध्ये गणला जातो. अनेकांच्याच व्हेजिटेरियन डाएटमध्ये मशरुम महत्त्वाची भूमिका बजावतो.
जगभरात आणि भारतातही मशरुमचे अनेक प्रकार अस्तित्वात असून, बटन मशरुम, शिटाके मशरुम आणि ऑयस्टर मशरुम हे त्यातील काही निवडक प्रकार.
शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मशरुमचं सेवन फायद्याचं ठरतं.