'मोदी मंगळावर जातील आणि तेथेही थापा मारतील'
मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोंडसुख घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला. सातत्याने परदेश दौरे करणाऱ्या मोदींचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. मोदींच्या घरावर उडती तबकडी फिरताना दिसली, अशी बातमी होती. बरोबर आहे आता पृथ्वीवर बघण्यासारखं राहिलं नाही. त्यामुळे पुढे चार दिवसात बातमी येईल मोदी मंगळावरती रवाना, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. मोदींचे आता परग्रहावर दौरे सुरु होतील, चार वर्ष देशात थापा मारून झाल्या आहेत आता तिथे जाऊन थापा मारतील, असेही ते म्हणाले.
आमच्याशी काडीमोड करताना विचार केला नाही. शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजे शिवसेना, आम्ही हिंदुत्व कधी सोडलं नाही. सत्ता आली काय आणि गेली काय. गेलेली सत्ता आम्ही परत खेचून आणू, पण हिंदुत्व कधी सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जम्मू-कश्मीरच्या सरकारचा पाठिंबा भाजपने काढून घेतला, त्यांचं अभिनंदन आहे. पण जम्मू-कश्मीरचं सरकार हे नालायक आहे कळायला तुम्हाला आज तीन-साडे तीन वर्ष लागली?, त्याच्यासाठी माझ्या भारत मातेचे ६०० जवान शहीद व्हावे लागले? आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळले ते नालायक आहेत, असा खणखणीत सवाल त्यांनी भाजपला यावेळी केला.
रमजान आला शस्त्रसंधी केली, ही काही कश्मीर सरकारनं केली नव्हती केंद्र सरकारनं केली होती. आज ज्या सरकारचा तुम्ही पाठिंबा काढला त्या सरकारनं शस्त्रसंधी नव्हती केली. कारण सैन्य केंद्र सरकारच्या अखत्यारित असतं. ईदसाठी घरी जात असलेल्या औरंगजेबला मारलं. अशा लोकांसाठी शस्त्र संधी करता. पाकिस्तान कधी वरात्र-दिवाळी-गणपतीला शस्त्रसंधी करतं का?, असा सवाल करत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
मी अनेकदा सांगितलं आहे की आम्ही कुणीही गोहत्येच्या बाजूनं नाही, असू शकत नाही पण केवळ गायीला वाचवणं हे हिंदुत्व नाही. पण तो औरंगजेब हा धर्मानं मुसलमान असला तरी माझ्या देशासाठी बलिदान केलं. त्या पाकड्यांना शरण न जाता त्यानं मरण पत्करलं, त्याला मुजरा करणं हे आमचं हिंदुत्व, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
'मोदी मंगळावर जातील आणि तेथेही थापा मारतील'
