दिवाळीच्या (Diwali 2023) सुट्टीत गावाला जाण्याचा नियोजन करत असाल तर तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.
रेल्वेचं बुकिंग फूल झालंय आणि खाजगी बसेस अव्वाच्या सव्वा वसूल करतात. अशाच सामान्य माणसाला आधार असतो तो एसटी बसचा.
पण जर तुम्ही एसटीने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर या प्रवासासाठीही तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.
दिवाळीच्या काळात प्रवास करण्यासाठी तुम्हाला अधिकाचे पैसे मोजावे लागणार आहेत.
महसूल वाढवण्याच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार एसटी महामंडळाने या दिवाळीच्या हंगामात आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
एसटीची ही भाडेवाढ 7 नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपासून म्हणजे 8 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होईल.
ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण केले आहे, त्यांच्या तिकीटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे.