हवामानात होणारे सातत्यपूपर्ण बदल अद्यापही सुरूच असून, राज्यात मे महिन्यातील उष्णतेच्या झळा आतापासूनच जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई शहर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातही मोठ्या फरकानं तापमानात वाढ झाली आहे. याच तापमानवाढीच्या धर्तीवर पुढील 48 तास राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या चार जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून ही माहिती जारी करण्यात आल्यानंतर नागरिकांना काही मार्गदर्शक सूचना देत उष्णतेच्या लाटेदरम्यान आरोग्याची कशी काळजी घ्यावी याबद्दलचीही माहिती देण्यात आली.
कडक उन्हाच्या या दिवसांमध्ये घराबाहेर पडताना छत्री, पाण्याची बाटली सोबत बाळगा. सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सूती कपडे वापरण्याला प्राधान्य द्या. उष्माघातापासून दूर राहण्यासाठी लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी प्या.
सहसा दुपारी बाहरे पडणं टाळा. उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती, हृदय रोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिडाचे विकार असणाऱ्या व्यक्ती, लहान मुलं, खेळाडू यांनी अधिक काळजी घ्या.
उष्माघाताची लक्षणं आढळल्यास लगेचच नजीकच्या खसागी अथवा सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधा.