What Is US Gold Card Citizenship Scheme: अमेरिकेमध्ये सत्तांतर झाल्यानंतर हा देश राजकीय निर्णय आणि दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे कायमच चर्चेत असल्याचं दिसतंय. खास करुन ट्रम्प यांच्या काही आगळावेगळ्या निर्णयांमुळे मागील काही आठवड्यांमध्ये अगदी जागभरातील शेअर बाजारांच्या पडझडीपासून ते अंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कटूता येण्याबद्दलच्या अनेक घटना घडल्यात. ट्रम्प यांनी हाती घेतलेल्या मोहिमांपैकी सर्वात महत्त्वाची मोहीम ही स्थलांतरितांना मायदेशी परत पाठवण्याची आहे.
ट्रम्प यांनी 3 विमानं भरुन भारतीय मागील काही आठवड्यात परत पाठवलेत. इतर देशांबरोबरही त्यांनी असेच केलं आहे. एकीकडे स्थलांतरितांना बाहेर काढतानाच आता ट्रम्प यांनी श्रीमंतांसाठी आर्थिक महासत्तेची दारं खुली केली आहेत. पैसे द्या अन् अमेरिकेचे नागरिक व्हा अशी थेट योजना ट्रम्प यांनी जाहीर केली आहे. या योजनेला 'गोल्ड कार्ड' असं नाव देण्यात आलं आहे. ही योजना काय आहे आणि किती रुपयांमध्ये अमेरिकेचं नागरिकत्व विकत मिळणार आहे ते पाहूयात...
आता तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेचे नागरिकत्व विकत घेता येणार आहे. अशी घोषणा स्वत: ट्रम्प यांनीच केली आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींना 5 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 43 कोटी रुपये भरून अमेरिकेचं नागरिकत्व म्हणजेच ‘गोल्ड कार्ड’ विकत घेता येणार आहे. आधीच्या ग्रीन कार्डची जागा आता 'गोल्ड कार्ड' घेणार हे या घोषणेमधून स्पष्ट झालं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. "आधीच्या ईबी-5 (ग्रीन कार्ड) योजनेऐवजी आता 'गोल्ड कार्ड' योजना लागू केली जणार आहे. या योजनेच्या माध्यमातून 'गोल्ड कार्ड' घेणाऱ्यांना अमेरिकेचे कायमस्वरुपी नागरिकत्व दिले जाईल. 'गोल्ड कार्ड'च्या माध्यमातून ग्रीन कार्डप्रमाणेच लाभ मिळणार आहेत. या योजनेबद्दलची अधिक माहिती आम्ही पुढील दोन आठवड्यात जाहीर करू", असं ट्रम्प यांनी सांगितलं आहे.
आधीच्या ग्रीन कार्ड योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना अमेरिकेतील व्यावसायात गुंतवणूक करण्याच्या मोबदल्यात नागरिकत्व दिलं जात होतं. 10 लोकांना पूर्णवेळ नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन ग्रीन कार्ड योजनेतून नागरिकत्व घेणाऱ्यांना द्यावे लागत होते. आता ही योजना कालबाह्य होऊन त्याची जागा 'गोल्ड कार्ड' योजना घेणार आहे.
ही योजना सुरु करण्यामागे काय विचार आहे याबद्दलही ट्रम्प यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “श्रीमंत लोक अमेरिकेत आल्यास ते अधिक श्रीमंत होतील. ते अधिक यशस्वी होतील. त्यांना इथले कर भरावे लागतील, इथल्या लोकांना रोजगार द्यावा लागेल. ही योजना नक्कीच चांगलं यश मिळवले, यात शंका नाही”, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.
ट्रम्प यांनी आपलं म्हणणं मांडल्यानंतर एका पत्रकाराने त्यांना, रशियन नागरिकांनाही 'गोल्ड कार्ड' देणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर ट्रम्प यांनी, "होय, रशियन अब्जाधीशांनाही याचा लाभ मिळू शकतो. मी काही रशियन अब्जाधीशांना ओळखतो, ते फार चांगले लोक आहेत. किमान एक मिलियन परदेशी नागरिकांना 'गोल्ड कार्ड' दिले जाऊ शकते, अशी शक्यता ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.