Neelam Shinde News: निलमच्या पालकांना अखेर व्हिसा मिळणार? 14 दिवसांपासून अमेरिकेत देतेय मृत्यूशी झुंज

निलम शिंदेच्या वडिलांना 'व्हिसा'साठी मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासात मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 27, 2025, 07:12 PM IST
Neelam Shinde News: निलमच्या पालकांना अखेर व्हिसा मिळणार? 14 दिवसांपासून अमेरिकेत देतेय मृत्यूशी झुंज

Neelam Shinde Accident : सातारा जिल्ह्यातील विद्यार्थिनी निलम शिंदेचा अमेरिकेत वाहनाच्या धडकेत अपघात झाला. हा अपघात कॅलिफोर्निया या ठिकाणी 14 फेब्रुवारी रोजी झाला होता. अपघातानंतर निलम शिंदे हिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर निलम शिंदेच्या अपघाताची बातमी तिच्या कुटुंबियांना मिळाली. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिच्याकडे जाण्यासाठी धावाधाव सुरु केली. मात्र, व्हिसा नसल्यामुळे त्यांना अमेरिकेला जाणे कठीण झाले. या घटनेची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निलम शिंदेच्या कुटुंबियांना तात्काळ अमेरिकेला रवाना होण्यासाठी त्यांच्या व्हिसाची लवकरात लवकर पूर्तता व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून निलम शिंदेच्या कुटुंबियांची मागणी मान्य झाली आहे. व्हिसाच्या मुलाखतीसाठी त्यांना वेळ देण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती एनडीटीव्हीने दिली आहे. 

व्हिसासाठी शुक्रवारी होणार मुलाखत

कॅलिफोर्नियामध्ये निलम शिंदेचा 14 फेब्रुवारी रोजी अपघात झाल्यानंतर ती कोमात गेल्याची माहिती समोर आलीय. तसेच तिच्या हातपाय देखील फ्रॅक्चर झाले आहेत. आता निलम शिंदेच्या वडिलांना अमेरिकेने शुक्रवारी सकाळी 9 वाजता आपत्कालीन व्हिसासाठी मुलाखतीसाठी अपॉइंटमेंट मंजूर केली आहे. निलमच्या वडिलांनी मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासात मुलाखत निश्चित केली आहे. मुंबईतील मुलाखतीसाठी निलम शिंदेचे वडिल आज रात्री साताऱ्याहून मुंबईसाठी निघणार आहेत. अशी माहिती तिच्या वडिलांनी एनडीटीव्हीला दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, सर्वांच्या मदतीनंतर आम्हाला अमेरिकन वाणिज्य दूतावासाकडून व्हिसाच्या मुलाखतीसाठी फोन आला. आता मुलाखतीनंतर आम्हाला व्हिसा मिळेल अशी आशा आहे असं ते म्हणाले. 

आपत्कालीन व्हिसा कसा मिळतो? 

जर कुटुंबातील एखादी व्यक्ती गंभीर आजारी किंवा मृत असेल तर अमेरिका त्यांच्या कुटुंबियांना आपत्कालीन व्हिसा देते. मात्र, या व्हिसासाठी डॉक्टरांकडून लेखी नोंद आवश्यक असते. यामुळे व्हिसा मुलाखतीच्या अपॉइंटमेंट्स जलद पद्धतीने करण्यासाठी अमेरिकन सरकारला विनंती करू शकतो. मात्र, अशा व्हिसासाठी मर्यादित जागा आहेत.