टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाने दमदार कामगिरी केलीय. एकही सामना न गमावता टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. आता टीम इंडिया सेमीफायनलमध्ये इंग्लंडशी भिडणार आहे.
या सामन्याआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने टीम इंडियावर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानी चॅनेलवर बोलताना त्याने हा आरोप केला.
इंझमामच्या आरोपांना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सडेतोड उत्तर दिलं आहे. सेमीफायनलच्या आदल्या दिवशी पत्रकार परिषदेत रोहित शर्मा बोलत होता.
अर्शदीप सिंगचा चेंडू रिव्हर्स स्विंग होतोय, अंपायरने डोळे उघडे ठेवावेत असं इंझमामने म्हटलं होतं. म्हणजे चेंडूशी छेडछाड केल्याशिवाय रिव्हर्स स्विंग होऊ शकत नाही असं त्याला सुचवायचं होतं.
या आरोपावर रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आला. विंडिजमध्ये ऊन आहे आणि खेळपट्टी ड्राय आहे. अशा खेळपट्टीवर चेंडू रिव्हर्स सिंग होणार नाही तर काय? असं उत्तर रोहित शर्माने दिलंय.
चेंडू रिव्हर्स स्विंग होतोय याला वेस्ट इंडिजमधलं वातावरण जबाबदार आहे. सर्वच संघांसाठी हे वातावरण सारखं आहे. त्यामुळे आरोप चुकीचे असल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगने तीन विकेट घेतल्या होत्या. या विजयानंतर टीम इंडियाने थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.