महेंद्रसिंग धोनीला आपला आदर्श मानणाऱ्या मिंझबाबत अनेक संघांमध्ये बोलीयुद्ध सुरू होते. लिलावात त्याचे नाव येताच पहिली बोली चेन्नई सुपर किंग्जने लावली. त्यानंतर मुंबई इंडियन्सही या शर्यतीत सामील झाली. मात्र गुजरातने बोलीमध्ये बाजी मारली.
रॉबिनच्या प्रतिभेची ओळख सर्वप्रथम मुंबई इंडियन्सने केली आणि झारखंडमधील या खेळाडूला क्रिकेट प्रशिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले होते.
गुजरात आपल्या संघात फिनिशरच्या शोधात होता. त्यामुळे आयपीएलच्या पुढील मोसमात रॉबिन ही भूमिका चमकदारपणे पार पाडेल, अशी आशा संघाला आहे.
गुजरात टायटन्स संघाने झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील आदिवासी क्रिकेटपटू रॉबिन मिंझवर 3 कोटी 60 लाख रुपयांची मोठी बोली लावली. त्याची मूळ किंमत फक्त 20 लाख रुपये होती.
रॉबिनने फक्त दहावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. त्याला इंग्रजी येत नाही. मात्र त्याला याची चिंता नाही. क्रिकेटची स्वतःची भाषा असल्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही, असे तो म्हणतो.
रॉबिनचे वडील लष्करातून निवृत्त होऊन बिरसा मुंडा विमानतळावर गार्ड म्हणून काम करतात. रॉबिनने 2020 क्रिकेटला आपले करिअर म्हणून निवडले आहे आणि त्यासाठी त्याने अभ्यासातून ब्रेक घेतला आहे.
रॉबिनच्या म्हणण्यानुसार त्याने वयाच्या 8 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज आहे. रांची येथील सोनेट क्रिकेट क्लबमध्ये चंचल भट्टाचार्य, एसपी गौतम आणि आसिफ हक यांच्या देखरेखीखाली त्याने आपल्या खेळात सुधारणा केली.